“वंदे मातरम” वरून नवा वाद पेटला; मुस्लिम समाजाचा विरोध, अबू आझमींच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

    31-Oct-2025
Total Views |
 
Abu Azmi statement
 Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रात “वंदे मातरम” (Vande Mataram) गाण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्य सरकारने शाळांमध्ये ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत “वंदे मातरम” चे पूर्ण गीत गाण्याचा आदेश दिल्यानंतर समाजवादी पक्षाने या निर्णयाचा विरोध दर्शवला आहे.
 
शालेय शिक्षण विभागाने २७ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे की, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या “वंदे मातरम” या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सर्व शाळांमध्ये हे गीत पूर्ण स्वरूपात गायले जावे आणि विद्यार्थ्यांना त्याचा इतिहास सांगावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
 
मात्र, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी याला विरोध करत म्हटले, “वंदे मातरम गाणे कोणावरही लादू नये. प्रत्येक धर्माची स्वतःची श्रद्धा आणि परंपरा असते. त्यामुळे हे गाणे बंधनकारक करण्याचा निर्णय योग्य नाही.”
 
या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे राज्य मीडिया प्रमुख नवनाथ बान यांनी म्हटले, “ज्यांना वंदे मातरम म्हणायचे नसेल त्यांनी भारतात राहण्याचा अधिकार नाही. देशात राहायचे असेल तर राष्ट्रगीताचा सन्मान करावा लागेल.”
 
या पार्श्वभूमीवर “वंदे मातरम”चा मुद्दा पुन्हा एकदा धार्मिक आणि राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शिक्षण विभागाने मात्र आपला निर्णय कायम ठेवत सांगितले की, १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाळांनी हे गीत गाणे अपेक्षित आहे.