Image Source:(Internet)
मुंबई :
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवेची क्रांती घडवून आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या संकल्पनेतून आणि SEARCH संस्थेच्या सहकार्याने राज्य सरकारने आरोग्य सेवा थेट जंगलांपर्यंत नेणारा ‘मोबाईल मेडिकल युनिट्स’चा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
नक्षलग्रस्त आणि दुर्लक्षित भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत SEARCH आणि राज्य सरकार यांच्यात ऐतिहासिक करार झाला. या करारानुसार आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर आणि आशा कार्यकर्त्यांना SEARCH येथे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
हे प्रशिक्षण सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना दिल्याने हा महाराष्ट्रातील पहिला आणि अभिनव प्रयोग ठरत आहे. या नव्या मॉडेलमुळे आदिवासी भागात त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी होणार असून ग्रामीण आरोग्य प्रणालीला नवी दिशा मिळणार आहे.
आरोग्य थेट गावात, मोबाईल हॉस्पिटलची साथ-
धानोरा तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये मोबाईल मेडिकल युनिट्स दर आठवड्याला पोहोचत आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी घरपोच तपासणी, औषधोपचार आणि सल्ला देत असल्याने, ज्या भागात आधी आरोग्य सुविधा नव्हत्या तिथे आता उपचार सहज उपलब्ध झाले आहेत.
मोफत आरोग्य तपासणी मोहिमेमुळे आदिवासी नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास वाढला आहे. या नव्या उपक्रमामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलू लागला असून, आदिवासी भागात ही आरोग्यक्रांती सामाजिक विकासाचा नवा अध्याय लिहित आहे.
गडचिरोलीतील हा प्रकल्प फक्त आरोग्यसेवा नाही, तर आदिवासी समाजाच्या जीवनमान उन्नतीसाठीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.