Image Source:(Internet)
नागपूर :
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि २२ महत्त्वाच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उभारलेल्या आंदोलनात आज नवा टप्पा आला आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांनी आज नागपूर येथे आंदोलनस्थळी भेट देत बच्चू कडूंच्या लढ्याला आपला ठाम पाठिंबा दिला.
“मी नेता म्हणून नाही, तर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून इथे आलो आहे. सरकारने पहिल्याच दिवशी कोर्टाचा डाव टाकला; आता आपण त्याला प्रतिडावाने उत्तर द्यायला हवं,” असं जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं. त्यांनी पुढे म्हटलं, “कडू म्हणाले मुंबईला चला, पण मी म्हटलं नाही. सरकारलाच इथे यायला हवं होतं.”
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात आज सायंकाळी सात वाजता मुंबईत निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत कर्जमाफी, वीजबिल माफी, पीकविमा, शेतीमालाच्या हमीभावासह २२ मागण्यांवर चर्चा होणार आहे.
बच्चू कडू यांनी सांगितलं, “सरकारसोबत चर्चा होईल, पण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. काही निर्णय पटतील, काही नाही. पण लढा थांबवणार नाही.”
नागपूरमध्ये सुरु असलेल्या या आंदोलनात सुमारे दहा हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले असून राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी बुधवारी या आंदोलनामुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची गंभीर दखल घेत स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाने प्रशासनाला वर्धा रोड आणि इतर प्रमुख मार्ग तत्काळ मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत.
या सर्व घटनाक्रमामुळे शेतकरी आंदोलन आता निर्णायक वळणावर आले असून, आजच्या बैठकीतून काय निर्णय निघतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.