Image Source:(Internet)
पुणे:
महाराष्ट्र एटीएसने २७ ऑक्टोबर रोजी कोंढवा परिसरातून अटक केलेल्या संशयित जुबेर (Zubair) हंगरगेकर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल-कायदा संघटनेशी जुबेरचे थेट संबंध असल्याचे पुरावे मिळाले असून त्याच्याकडे सापडलेले साहित्य पाहून तपास यंत्रणादेखील स्तब्ध झाल्या आहेत.
लॅपटॉपमधील कट्टर सामग्रीचा उलगडा-
एटीएसच्या तपासादरम्यान जुबेरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदासंबंधी फाईल्स, व्हिडिओ आणि मार्गदर्शक साहित्य सापडले आहे. ए.के.-४७ रायफल चालवण्याचे तंत्र, स्फोटके तयार करण्याच्या पद्धतींची माहिती आणि जिहादी विचारधारेची दस्तऐवजं त्याच्याकडे होती. तपासकांनी या सर्व दस्तऐवजांचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे.
लादेनच्या भाषणाचा धागा-
अधिकाऱ्यांना जुबेरच्या संगणकात ओसामा बिन लादेनची उर्दूत भाषांतरित भाषणं आणि त्यावर आधारित ऑडिओ क्लिप्स आढळल्या आहेत. या भाषणांचा वापर करून तो इतर तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
तरुणांच्या संपर्कजाळ्याचा शोध-
जुबेरच्या संपर्कात असलेल्या कट्टर विचारसरणीच्या तरुणांची संख्या, तसेच त्याने किती जणांचं ब्रेनवॉशिंग केलं, हे समजण्यासाठी एटीएसने स्वतंत्र टीम तयार केली आहे. काही जण सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड अॅप्सद्वारे त्याच्याशी संवाद साधत होते, अशी माहिती मिळाली आहे.
देशातील अनेक शहरांवर हल्ल्याची योजना-
पुणे आणि मुंबईसह गुजरात व उत्तर भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये स्फोट घडवण्याचा कट रचल्याचा संशय तपासकांनी व्यक्त केला आहे. तसेच, २०२३ मध्ये उघडकीस आलेल्या आयएसआयएस नेटवर्कशी जुबेरचा काही संबंध आहे का, हेही तपासले जात आहे.
लाखोंच्या पगाराचा आयटी प्रोफेशनल निघाला दहशतवादी-
जुबेर हंगरगेकर हा एक उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअर असून एका आयटी कंपनीत लाखोंच्या पगारावर कार्यरत होता. मात्र, व्यावसायिक आयुष्याच्या आड तो गुपचूप कट्टरतावादी विचारसरणीकडे वळला. तपासात उघड झाले आहे की, त्याने आपले तांत्रिक ज्ञानही दहशतवादी क्रियांसाठी वापरण्याचा प्रयत्न केला होता.
एटीएसचा तपास वेगाने पुढे-
एटीएसने पुण्यातील १० वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र राबवले असून न्यायालयाने जुबेरला ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे नोंदवले आहेत.उच्च शिक्षण, आकर्षक पगार आणि आधुनिक जीवनशैली असूनही कट्टर विचारांच्या आहारी गेलेला जुबेर हंगरगेकर तपास यंत्रणांसाठी नवा आणि चिंताजनक नमुना ठरत आहे.