Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) संपूर्ण स्वरूपात म्हणणे अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चांगलाच खळबळ उडाली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या अमर गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला. याआधी शाळांमध्ये फक्त पहिले दोन श्लोक म्हटले जात होते, मात्र आता पूर्ण गीत गायले जाणार आहे.
या निर्णयावर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त करत, “वंदे मातरम म्हणणे सक्तीचे करणे हे लोकशाहीविरुद्ध आहे,” अशी भूमिका घेतली. त्यांच्या या विधानानंतर वातावरण अधिकच तापले असून, सत्ताधारी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी आझमींवर जोरदार निशाणा साधत म्हटलं, “ज्यांना वंदे मातरम म्हणायला त्रास होतो, त्यांनी भारतात राहण्याचा अधिकार नाही. असे लोक पाकिस्तानात जावेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “वंदे मातरम हे केवळ गीत नसून, स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे आणि त्याच्या १५०व्या वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.”
भाजपचे राज्य माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही आझमींच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत म्हटलं, “भारताच्या मातीत राहून भारत माता की जय म्हणण्यास नकार देणारे देशप्रेमी असू शकत नाहीत. अशा व्यक्तींनी देश सोडावा.”
दरम्यान, सत्ताधारी पक्ष या निर्णयाला राष्ट्रभक्तीला चालना देणारा निर्णय म्हणत असताना, विरोधकांचा आरोप आहे की हा आदेश धार्मिक ध्रुवीकरणाच्या हेतूने देण्यात आला आहे. वंदे मातरमच्या १५०व्या वर्षानिमित्त सुरू झालेला हा वाद आता राज्याच्या राजकारणात नवा वळण घेण्याची चिन्हे दिसत आहेत.