Image Source:(Internet)
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी (Gadchiroli) (३० सप्टेंबर) पोलिस व सिआरपीएफच्या संयुक्त कारवाईत एका कट्टर माओवादी कार्यकर्त्याला अटक करण्यात आली. हा माओवादी भामरागड परिसरात सुरक्षा दलांच्या हालचालींवर नजर ठेवून घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.
२९ सप्टेंबर रोजी भामरागड पोलिस व सिआरपीएफ ३७ बटालियन एफ कंपनीचे जवान माओवादविरोधी मोहिम राबवित असताना गुप्त माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला चौकशीदरम्यान तो चुकवाचुकवीची उत्तरे देत होता, मात्र पुढील कसून चौकशीत त्याची ओळख सैनु उर्फ सन्नु अमलु मट्टामी (३८, रा. पोयारकोठी, ता. भामरागड) अशी पटली.
पोलिस तपासात असे स्पष्ट झाले की मट्टामी याचा नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांत सक्रिय सहभाग आहे. २७ ऑगस्ट रोजी कोठी पोलिस ठाणे हद्दीतील कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीतही तो सामील होता. या संदर्भातील गुन्हा (अप.क्र. ०२/२०२५) कोठी पोलिसांत आधीच नोंदविण्यात आला असून त्याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते करीत आहेत.
ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सिआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, ३७ बटालियनचे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक व गोकुल राज जी तसेच पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवादी चळवळीविरोधातील कारवाया आणखी जोमाने सुरू राहतील असे स्पष्ट केले. तसेच, अजूनही हिंसेच्या मार्गावर असलेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून समाजमुखी व सन्माननीय जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.