Image Source:(Internet)
सोलापूर :
सोलापुरात (Solapur) सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये खळबळ माजवली आहे. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ची चाल खेळत दोन माजी आमदारांसह अनेक प्रभावशाली नेत्यांना आपल्या गळाला लावलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून, भाजपने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आपली भक्कम पायाभरणी केली आहे.
भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी अधिकृतपणे भाजप प्रवेश केला. त्यांच्यासोबत लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र देखील भाजपमध्ये दाखल झाले. या प्रवेशामुळे भाजपचा सोलापुरातील संघटनात्मक प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
भाजपचा पहिला डाव आणि राष्ट्रवादीला धक्का-
भाजपने शिंदे गटातील अंतर्गत असंतोष आणि राष्ट्रवादीतील मतभेद याचा फायदा घेत ‘मित्रपक्षावरच कुरघोडी’ करण्याचा डाव साधला आहे. स्थानिक राजकारणात भाजपचा हा मोठा ‘हुकमी एक्का’ मानला जात असून, पक्ष आगामी निवडणुकांत ‘स्वबळाचा नारा’ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीतील गटबाजीवर माजी आमदारांचे निशाणे-
भाजपमध्ये प्रवेशानंतर राजन पाटील आणि यशवंत माने यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीवर जोरदार टीका केली.
“पक्षात आता शिस्त उरली नाही. आमदार असताना सन्मान मिळाला, पण आमदारकी गेल्यावर वागणूक बदलली,” असे माजी आमदार यशवंत माने म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता, म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
तर राजन पाटील यांनी दावा केला की, “भाजप आता सोलापुरात सर्वात मजबूत पक्ष बनला आहे. भाजप एकटाच लढला तरी ‘कमळ’ फुलेल, आणि जर महायुतीत लढलो तर इतरांना फायदाच होईल.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भाजपने कुणालाही धक्का दिला नाही. स्वतःहून आमच्याकडे येणाऱ्या नेत्यांचं स्वागत करण्यात आलं आहे.
त्यांनी स्पष्ट केलं की, महायुतीत कोणतेही वितुष्ट नाही, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील.
सोलापुरातील या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आगामी निवडणुकांपूर्वी या घडामोडींमुळे राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.