दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई; अवघ्या १० दिवसांत ३०१ कोटींचे उत्पन्न, पुणे विभाग अव्वल!

    29-Oct-2025
Total Views |
 
Maharashtra ST
 Image Source:(Internet)
मुंबई :
यंदाच्या दिवाळीमध्ये (Diwali) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विक्रमी कामगिरी करत इतिहास रचला आहे. केवळ १० दिवसांच्या कालावधीत एसटीने तब्बल ३०१ कोटींचे उत्पन्न मिळवले असून, या यशात पुणे विभागाने २०.४७ कोटींसह राज्यात अग्रक्रम पटकावला आहे. त्याच्या पाठोपाठ धुळे (१५.६० कोटी) आणि नाशिक (१५.४१ कोटी) विभागांनीही दमदार कामगिरी केली आहे.
 
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व अधिकारी, चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत “ही एसटी परिवारासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगितले.
 
१८ ते २७ ऑक्टोबर या दिवाळी हंगामात एसटीने दररोज सरासरी ३० कोटींहून अधिक उत्पन्न मिळवत एकूण ३०१ कोटींची विक्रमी कमाई केली. विशेष म्हणजे २७ ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासादरम्यान एका दिवसात तब्बल ३९.७५ कोटींचे उत्पन्न मिळवत या वर्षातील सर्वाधिक दैनिक उत्पन्नाचा नवा विक्रम नोंदवला गेला.
 
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एसटीच्या कमाईत ३७ कोटींची वाढ झाली असून, सुट्ट्यांच्या काळातील विशेष फेऱ्या आणि प्रवाशांचा वाढता ओघ हे या यशामागील प्रमुख घटक असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.
 
मात्र मंत्री सरनाईक यांनी हेही नमूद केले की, गेल्या चार महिन्यांपासून एसटीला तोट्याचा सामना करावा लागला आहे. अवकाळी पाऊस आणि पूरस्थितीमुळे जून ते सप्टेंबर दरम्यान १५० कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या गर्दीतून आर्थिक स्थिती सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
 
ऑक्टोबरसाठी निश्चित केलेले १०४९ कोटींचे उत्पन्न लक्ष्य पूर्णपणे साध्य झाले नसले तरी, पुणे, बीड, अमरावती आणि बुलढाणा विभागांनी उल्लेखनीय कामगिरी करून गेल्या वर्षीपेक्षा चांगले परिणाम दाखवले. मात्र सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि धाराशिव विभागांची कामगिरी अपेक्षेइतकी ठरली नाही.
 
या पार्श्वभूमीवर सरनाईक म्हणाले, “तोट्यातील विभागांचे सखोल विश्लेषण करून आवश्यक सुधारणा केल्या तर एसटी पुन्हा नफ्यात येईल. कार्यक्षम नियोजन आणि समन्वय हेच यशाचे गमक आहे.”
 
दिवाळीच्या काळात प्रवाशांना सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक करत म्हटले, प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हीच एसटीची खरी दिवाळी आहे.