शिंदे-पवारांनी स्वाभिमान दाखवायचा असेल तर सत्ता सोडावी; संजय राऊतांचा घणाघात

    28-Oct-2025
Total Views |
 
Sanjay Raut
 Image Source:(Internet)
मुंबई :
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “देशभरात भाजप कुबड्यांच्या जोरावर सत्तेत आली आहे. बिहारमध्ये एक कुबडी, तर महाराष्ट्रात दोन कुबड्या आहेत. भाजपची नीतीच अशी कुबड्या घ्या, वापरा आणि नंतर फेका!” अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
 
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात एकेकाळी भाजपला ओळखणारे लोकच नव्हते. त्यांच्या पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. भाजपासाठी काम करा, त्यांना उभं करा. आज तेच लोक आम्हालाच शिकवतात!”
 
अमित शाह उशिरा आले, पण व्यापार मांडला-
राऊतांनी पुढे अमित शाहांवर थेट हल्ला चढवला. “अमित शाह राजकारणात फार उशिरा आले. त्यांनी राजकारणाला व्यापाराचे स्वरूप दिलं. भाजपमध्ये त्यांनी व्यापारी मानसिकतेची पिढी निर्माण केली आहे. समाजकारणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. म्हणूनच आज ‘ही कुबडी नको, ती कुबडी नको’ असं सुरू आहे,” अशी टीका राऊतांनी केली.
 
त्यांनी पुढे सांगितले, “अमित शाह म्हणतात महाराष्ट्रात भाजप कोणाच्या कुबड्यांवर नाही चालत. मग त्यांना विचारावं जर खरंच स्वाभिमान असेल तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडावं.
 
बाळासाहेबांचा तो स्वाभिमान आज कुठे?
बाबरी आंदोलनानंतरचा एक किस्सा सांगताना राऊत म्हणाले, “तेव्हा आम्ही देशभरात लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण अटल बिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेबांना विनंती केली की, ‘तुम्ही उमेदवार उतरवलात तर भाजपचं नुकसान होईल.’ आणि बाळासाहेबांनी एका क्षणात आपले उमेदवार मागे घेतले. एवढा मोठा त्याग आज कोण करतोय?”
 
भाजपची ‘ट्रिपल इंजिन’ची महत्त्वाकांक्षा-
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच म्हटले की, “महाराष्ट्रात भाजप कोणाच्या आधारावर चालत नाही. डबल इंजिन सरकार आहे आणि आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये विजय मिळवून ट्रिपल इंजिन सरकार आणू.” शाहांच्या या विधानानंतर विरोधकांकडून संताप आणि प्रश्नांचा पाऊस पडत आहे.
 
राऊत म्हणाले, शाह समाधानी असतील, पण आम्ही नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमान आणि संस्कार अजूनही जिवंत आहेत. त्या स्वाभिमानावर कुणी व्यापारी हक्क गाजवू शकत नाही.