Image Source:(Internet)
यवतमाळ :
जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत कलहामुळे अखेर प्रवीण देशमुख यांनी काँग्रेसचा (Congress) ‘हात’ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) ‘घड्याळा’ला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यवतमाळ जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या प्रवेश सोहळ्याचं आयोजन अखेर गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम स्थानिक समता मैदानावर पार पडणार असून, या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीचा मोठा जल्लोष असेल.
ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राज्य उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. सामाजिक न्याय, समानता आणि विकास या तत्त्वांवर उभ्या या पक्षाच्या धोरणांनी अनेक कार्यकर्ते प्रेरित झाले असून, काँग्रेससह इतर पक्षांतील अनेक नेते राष्ट्रवादीत येत आहेत.”
मोठ्या प्रमाणात पक्षांतरे-
प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस गटासोबतच अरुण राऊत, अशोक घरफलकर यांसारखे नेते तसेच कलंब, बाभुळगाव, उमरखेड, वणी आणि मारेगाव तालुक्यांतील शेकडो स्थानिक कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य, तसेच माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
हा भव्य प्रवेश सोहळा यवतमाळमधील पोस्टर ग्राऊंडवर होणार असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.