Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी पुन्हा एकदा आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांचं नव्या हिंदी भजनाचं शीर्षक ‘कोई बोले राम राम कोई खुदाए’ असून ते सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. टी-सीरिज (T-Series) या लोकप्रिय संगीत संस्थेअंतर्गत हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
या भजनाच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी “सर्व धर्म एकच, ईश्वर एकच” असा शांततेचा आणि ऐक्याचा संदेश दिला आहे. गाणं रिलीज झाल्यापासून काही तासांतच हजारो व्ह्यूज मिळाले असून, नेटिझन्सकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘कोई बोले राम राम’ – भक्तीचा आधुनिक आविष्कार-
अमृता फडणवीस या केवळ राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या जोडीदार नाहीत, तर स्वतःच्या कर्तृत्वाने ओळख निर्माण केलेल्या कलाकार आहेत. त्यांच्या आवाजातली खासियत आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे हे भजन श्रोत्यांच्या मनाला भिडतं. याआधीही त्यांनी ‘देवाधीदेव तू महादेव’ या भक्तिगीताद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली होती. ते गाणं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं होतं, तर संगीतगुरू शंकर महादेवन यांनी त्यांच्यासोबत गायले होते.
बहुगुणी व्यक्तिमत्त्व —
अमृता फडणवीस या बँकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका या तिन्ही भूमिकांमध्ये आपली वेगळी छाप सोडतात. त्यांनी गेल्या १७ वर्षांपासून ॲक्सिस बँकेत (Axis Bank) कार्यरत राहून उपाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास केला आहे. कामाच्या व्यापातही त्या संगीताविषयीचा छंद जोपासतात आणि विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात.
‘कोई बोले राम राम’ या नव्या भजनाद्वारे अमृता फडणवीस यांनी केवळ संगीतविश्वातच नव्हे तर सामाजिक ऐक्याच्या विचारांना बळ देत आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे.