Image Source:(Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधत वर्ली मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आहे. जवळपास १९ हजार नावे संशयास्पद असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मतदार याद्यांमधील चुका किरकोळ नसून त्या एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे दिसत आहे. काही मतदारांचे छायाचित्र गायब आहेत, काहींचे पत्ते अस्तित्वात नाहीत, तर अनेक मृत व्यक्तींची नावे अद्याप यादीत आहेत. काही मतदारांची नावे दक्षिण भारतीय भाषांमध्ये लिहिलेली दिसतात, जी मुंबईतील मतदारांसाठी अत्यंत अनोखी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
एका पक्ष बैठकीत त्यांनी दस्तऐवज सादर करत निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली. “काही ठिकाणी एका लहानशा घरात किंवा दुकानात अनेक मतदार दाखवले गेले आहेत. अनेक शंभरी पार केलेल्या व्यक्तींची नावे अजून यादीत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांचे निधन झाले आहे. हा केवळ गोंधळ नाही, तर मतं चोरण्याचा प्रयत्न आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. “मतं चोरणं म्हणजे लोकशाही चोरणं आहे. आम्ही ही लढाई मसुदा मतदार यादीपासूनच सुरू करू,” असा इशारा देत त्यांनी निवडणूक आयोगाकडून तत्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.