Image Source:(Internet)
गडचिरोली :
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या पक्षांतराच्या हालचालींनी राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजवली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गडचिरोली नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेडीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक राजकारणात प्रभावी ओळख असलेल्या पोरेडीवार यांनी दीर्घकाळ राष्ट्रवादीसोबत कार्य केलं होतं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष कार्यक्रमात पोरेडीवार यांचा काँग्रेस प्रवेश पार पडला. या प्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
याच कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षला तेलमुले यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. दोन वरिष्ठ नेत्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठी ताकद मिळणार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील या घडामोडीमुळे शरद पवार गटाचे समीकरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर पवार गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
राज्यभर सध्या सुरू असलेल्या या पक्षांतरांच्या मालिकेमुळे महाविकास आघाडीसमोर नवे प्रश्न उभे राहिले आहेत. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्यातील अंतर्गत मतभेद उफाळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.