कोल्हापुरात अवकाळी पावसाचा कहर; दिवाळीनंतरही मुसळधार सरींनी केली झोडपाट!

    25-Oct-2025
Total Views |
- शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Unseasonal rainsImage Source:(Internet) 
कोल्हापूर :
ऐन दिवाळीनंतर कोल्हापुरात (Kolhapur) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारपासून मुसळधार सरी कोसळत राहिल्याने शहरासह ग्रामीण भागात पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
 
दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर दुपारी आकाशात अचानक काळेकुट्ट ढग दाटले आणि काही क्षणातच मुसळधार सरी सुरू झाल्या. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. काही वेळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा रात्रीपर्यंत सरींचा जोर वाढतच गेला.
 
शहरातील महाद्वार रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी परिसरात रस्ते जलमय झाले. गटारे, नाले दुथडी भरून वाहू लागले, तर रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकही त्रस्त झाले.
 
दरम्यान, ग्रामीण भागातही पावसाने कहर केला असून, शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे भात, सोयाबीन, मका आणि भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतीच काढणीला आलेली भात पिके भिजल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे. "मे महिन्यापासून हा पाऊस पाठ सोडायला तयार नाही, आता हिवाळ्यातही आमची परीक्षा घेतोय," अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटल्या आहेत.
 
ऑक्टोबर अखेरपर्यंत थंडीची चाहूल लागण्याची अपेक्षा असताना, अवकाळी पावसाने पुन्हा थंडीला आडवे केले आहे. परिणामी, "थंडीऐवजी आता पावसाचाच हंगाम सुरू झाला की काय?" असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसला असून, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा तातडीने आढावा घेण्याची मागणी होत आहे.