ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; अखेरच्या श्वासापर्यंत पत्नी मधू यांची साथ!

    25-Oct-2025
Total Views |

Veteran actor Satish ShahImage Source:(Internet) 
 
मुंबई :
मनोरंजन विश्वासाठी आजचा दिवस शोकाचा ठरला आहे. लोकप्रिय अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांनी अखेरच्या क्षणी पत्नी मधू यांच्या उपस्थितीत जगाचा निरोप घेतला.
 
25 जून 1951 रोजी मुंबईत जन्मलेले सतीश शाह हे मूळचे गुजराती कुटुंबातील होते. शिक्षणानंतर त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. याच काळात त्यांची ओळख नसीरुद्दीन शाह, सतीश कौशिक यांसारख्या प्रतिभावान कलाकारांशी झाली. त्यानंतर 1978 साली ‘अजीब दास्तान’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
 
सतीश शाह हे विनोदी भूमिकांसाठी विशेष ओळखले जात. ‘साराभाई विरुद्ध साराभाई’, ‘जाने भी दो यारो’, ‘मैं हूं ना’, ‘ओ दरजी’ यांसारख्या मालिकांमधील आणि चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. सहजसुंदर अभिनय, नेमका टायमिंग आणि चेहऱ्यावरील भाव यांनी ते प्रेक्षकांचे लाडके बनले.
 
1982 मध्ये त्यांनी फॅशन डिझायनर मधू शाह यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला अपत्य नव्हते, पण दोघांनीही एकमेकांना सदैव भक्कम आधार दिला. सतीश शाह यांनी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अलिप्त राहणं पसंत केलं आणि पूर्णपणे अभिनयाला वाहून घेतलं.
 
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 250 हून अधिक चित्रपट आणि अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. माध्यमांच्या अहवालानुसार, सतीश शाह यांची एकूण संपत्ती सुमारे पाच कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं समोर आलं आहे.
 
सतीश शाह यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक उमदा कलाकार, विनोदाचा अद्भुत जादूगार आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा कलाकार गमावला आहे. त्यांच्या आठवणी आणि अभिनयाची मोहिनी कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील.