Image Source:(Internet)
मुंबई :
दिवाळीचा (Diwali) सण सुरू असतानाच राज्यभर पुन्हा एकदा पावसाचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता गारव्याचा स्पर्श जाणवू लागला आहे. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झालं असून हवामान विभागानं पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाके, दिवे आणि उत्साहासोबतच छत्रीचीही साथ लागणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात आज आकाश दाटून राहणार असून काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्रातही लाटांची तीव्रता वाढू शकते, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यातील लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत अधूनमधून सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि वर्धा भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाने नागरिकांना विजांच्या कडकडाटाच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आवाहन केले आहे. उघड्यावर न थांबणे, झाडाखाली आसरा न घेणे आणि फटाके फोडताना सुरक्षित अंतर राखणे याचा विशेष सल्ला देण्यात आला आहे. दिवाळीच्या दिव्यांसह आता आभाळातून येणाऱ्या सरींचा थंडावा अनुभवायला मिळणार आहे.