Image Source:(Internet)
मुंबई :
दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणांमध्ये भाऊबीज (Bhaubij) हा दिवस सर्वात भावनिक आणि जिव्हाळ्याचा मानला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा होणारा हा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचं प्रतीक. या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करतो.
भाऊबीजविषयी अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी सर्वाधिक प्रसिद्ध कथा म्हणजे यमराज आणि त्याची बहीण यमुना यांची. असं म्हणतात की, यमुनेने आपल्या भावाला घरी बोलावून प्रेमानं जेवण घातलं. यमराजाने तिच्या हातचं अन्न आनंदाने स्वीकारलं. त्या दिवसापासून ‘यमद्वितीया’ असा दिवस साजरा केला जातो. श्रद्धेनुसार या दिवशी स्नान करून यमपूजन केल्यास आयुष्य दीर्घ, निरोगी आणि आनंदी राहते.
या दिवशी बहिण आपल्या भावाला पाटावर बसवते, दिवा लावते, हळद-कुंकू आणि अक्षतांनी त्याचं ओवाळन करते. घरभर गोड पदार्थांचा सुगंध आणि प्रेमाच्या भावनांचा दरवळ पसरतो. ओवाळणीनंतर भावाला साजूक तुपाचं जेवण वाढलं जातं आणि भाऊ बहिणीला दागिने, कपडे किंवा पैसे भेट देतो.
महाराष्ट्रात हा सण भाऊबीज नावाने साजरा केला जातो, तर उत्तर भारतात आणि नेपाळमध्ये भाईदूज किंवा भाई टीका म्हणून. नावं वेगळी असली, तरी अर्थ तोच — बहिणीचं प्रेम आणि भावाची जपणूक.
धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या दिवशी बहिणीत देवत्व जागृत होतं, असं शास्त्र सांगतं. तिच्या हातची ओवाळणी आणि भोजन भावाला आध्यात्मिक बळ आणि शुभ फल देणारं मानलं जातं.
आजच्या काळातही भाऊबीज फक्त घरापुरता न राहता समाजभावना जागवणारा सण ठरत आहे. अनेक सामाजिक संस्था या दिवशी सैनिक, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, वृद्धाश्रमातील रहिवासी आणि समाजातील वंचित भगिनींना ओवाळून हा सण साजरा करतात. त्यामुळे भाऊबीज हा सण बंधुत्व, कृतज्ञता आणि प्रेमाचा संदेश देणारा ठरतो.
प्रत्येक बहिणीच्या प्रार्थनेत एकच भाव दडलेला असतो.माझा भाऊ सदैव सुखी राहो, त्याच्यावर संकटांचं सावट कधीच येऊ नये.
आणि हाच भाव भाऊबीजच्या प्रत्येक ओवाळणीतून झळकतो. म्हणूनच भाऊबीज ही फक्त परंपरा नाही, तर नात्यांच्या ओलाव्याची, प्रेमाच्या जिव्हाळ्याची आणि एकमेकांविषयीच्या काळजीची जाणीव करून देणारी सुंदर परंपरा आहे.