- जाणून घ्या ५ महत्त्वाच्या सावधानता टिप्स
Image Source:(Internet)
मुंबई :
दिवाळी (Diwali) म्हणजे प्रकाश, आनंद आणि सणाचा जल्लोष. पण या रोषणाईच्या सणात फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणातील प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचते. याचा सर्वाधिक फटका बसतो तो अस्थमा आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना.धूर, धूळ आणि थंडीचा तिहेरी मारा दम्याच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे दिवाळीच्या काळात योग्य काळजी न घेतल्यास श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि छातीत दडपण वाढू शकते.
‘ब्रॉन्कियल ट्यूब्स’मध्ये सूज आल्याने अस्थमा होतो
अस्थमाच्या रुग्णांच्या फुफ्फुसातील वायुमार्ग सुजतात, अरुंद होतात आणि श्वास घेणे कठीण बनते. मुख्य कारणांमध्ये धूर, धूळ, परफ्यूमचा वास, थंडी आणि हवेतले प्रदूषण यांचा समावेश होतो. सुरुवातीला किरकोळ वाटणारा खोकला किंवा श्वास फुलणे दुर्लक्षित केल्यास ते गंभीर दम्याच्या झटक्यात रूपांतरित होऊ शकते.
दिवाळीत धोका अधिक का वाढतो?
फटाक्यांमधून निघणारा धूर, सल्फर, नायट्रेट आणि इतर रासायनिक कण हवेत मिसळून प्रदूषणाचे प्रमाण वाढवतात. या प्रदूषित हवेमुळे अस्थमाग्रस्त रुग्णांच्या फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतो. याशिवाय, दिव्यांचा धूर, अगरबत्तीचा वास आणि हवामानातील थंडावा हे सर्व घटक ‘ट्रिगर’ म्हणून काम करतात.
दिवाळीत अस्थमा रुग्णांसाठी ५ आवश्यक काळजी टिप्स :
१. प्रदूषणापासून स्वतःला वाचा-
फटाक्यांचा धूर वाढलेल्या भागात जाणे टाळा. घराबाहेर पडताना N95 मास्क वापरा आणि घरातील खिडक्या बंद ठेवा.
२. इनहेलर आणि औषधे नेहमी जवळ ठेवा-
दम्याच्या झटक्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्या औषधांसह इनहेलर नेहमी सोबत ठेवा. कुटुंबातील सदस्यांनाही त्याचा वापर कसा करायचा हे शिकवा.
३. घरातील हवेची शुद्धता राखा-
एअर प्युरिफायर वापरा, घरात धूळ साचू देऊ नका. बुरशी किंवा दमटपणा दिसल्यास लगेच साफसफाई करा.
४. फटाक्यांपासून अंतर ठेवा-
फटाके फोडणे तर दूरच, जवळ जाणेही टाळा. फटाक्यांचा धूर श्वसनसंस्थेला थेट इजा पोहोचवू शकतो.
५. हलका आणि पौष्टिक आहार घ्या-
दिवाळीत गोड-तेलकट पदार्थांपासून शक्यतो दूर राहा. पाणी मुबलक प्या आणि दररोज श्वसन व्यायाम करा — यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता टिकून राहते.
तज्ज्ञांचा सल्ला -
मुंबईतील वरिष्ठ छातीचे रोगतज्ज्ञ डॉ. हरीश चाफले यांच्या मते, “दिवाळीच्या काळात अस्थमाच्या रुग्णांनी औषधे नियमित घ्यावीत आणि प्रदूषण टाळावे. कोणत्याही लक्षणात वाढ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे विलंब न करता आवश्यक आहे.