Image Source:(Internet)
नवी दिल्ली:
दिवाळीचा (Diwali) सण देशभर उत्साहाने साजरा केला जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा खासपणे देशातील शूर जवानांसोबत हा सण साजरा केला. यावेळी त्यांनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर असलेल्या आयएनएस विक्रांत जहाजावर भेट देऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
पंतप्रधान मोदी यांनी जवानांना संबोधित करताना सांगितले, “तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणे हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे. माझ्या एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला माझ्या शूर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. या समुद्रावर चमकणाऱ्या सूर्यकिरणांमध्ये मी तुमच्या पराक्रमाचे प्रतिबिंब पाहतो.”
मोदी यांनी सैनिकांची मेहनत आणि त्यांचे धैर्य उच्चस्तरीय असल्याचे कौतुक करत म्हणाले, “जहाज लोखंडाचे असते, पण तुमच्या शौर्यामुळे ते शूर बनते. तुमच्या साधनेमुळे आणि तयारीमुळेच देश सुरक्षित आहे.”
यावेळी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा देत म्हटले, “आपल्या तिन्ही सेनांमधील समन्वयामुळे आपण पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. कोणताही धोका किंवा संघर्ष संभवत असला तरी जो आपल्या ताकदीवर ठाम राहतो, त्यालाच फायदा मिळतो.”
सैनिकांना सलाम करताना मोदी म्हणाले, “सशस्त्र दलाला खऱ्या अर्थाने प्रभावी बनवण्यासाठी ते मजबूत, सक्षम आणि आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे.”
आयएनएस विक्रांतच्या महत्त्वावर बोलताना त्यांनी अधोरेखित केले की, “काही महिन्यांपूर्वीच आयएनएस विक्रांतचे नाव ऐकून संपूर्ण पाकिस्तानची झोप उडाली होती. हे जहाज शत्रूच्या धैर्याचा अंत करणारे असून ‘मेड इन इंडिया’ चे प्रतीक आहे. महासागराला भेदून जाणारे हे स्वदेशी विक्रांत भारताच्या सैन्य सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे.”
यंदाची दिवाळी पंतप्रधान मोदींसाठी आणि देशातील शूर जवानांसाठी खास ठरली असून, त्यांनी सर्व देशवासियांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.