राज ठाकरे फक्त भाषणं नको, मोहल्ल्यावर जाऊन मतदार यादी तपासा;नितेश राणेंचा थेट सल्ला

    20-Oct-2025
Total Views |
 
Raj Thackeray and Nitesh Rane
Image Source:(Internet) 
मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेनंतर त्यांच्या भाषणावरून राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी चिमटे देणारी टीका केली आहे. ठाकरे कुटुंबाशी नातेसंबंध असले तरी नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
 
“राज ठाकरे हे अभ्यासू आणि मुद्देसूद बोलणारे नेते आहेत, पण लोकसभेनंतर अचानक वोट चोरीचा मुद्दा कसा उचलला गेला? तेव्हाच का नाही बोलले?” असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला.
 
ते म्हणाले, “वाढवण बंदरामुळे 12 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे — थेट आणि अप्रत्यक्षरित्या दोन्ही. मग हा प्रकल्प वाईट कसा झाला? विकासाच्या प्रत्येक योजनेत संधी आहे, पण काहींना विकासच डोळ्यात खुपतोय.”
 
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नयेत-
राज ठाकरेंच्या सभेतील आरोपांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “राज ठाकरे उद्धव ठाकरेंसारखी भाषा बोलत आहेत. चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन 1950 मध्ये झालं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1956 मध्ये सुरू झाली. इतिहास नीट समजून घेतला पाहिजे.
 
मोहल्ल्यावर जाऊन तपासा मतदार यादी-
नितेश राणे म्हणाले, “राज साहेबांना जर मतदार यादीत घोळ दिसतोय, तर त्यांनी स्वतः मोहल्ल्यावर जाऊन तपासणी करावी. मालेगाव, बहरमपाडा, नळ बाजार अशा भागात जाऊन पाहावं. फक्त सभेतून बोलणं पुरेसं नाही.”
 
ते पुढे म्हणाले, “आमचे कार्यकर्ते हाजीअलीवर हनुमान चालीसा म्हणाले तर चालेल का? वातावरण कोण खराब करतंय हे सर्वांना माहीत आहे. नमाजसाठी मशिदी कमी पडतात आणि मोर्चे रस्त्यावर काढले जातात.
 
अबू आझमी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांवर बोलताना नितेश राणे म्हणाले, “मानखुर्द आणि शिवाजीनगर परिसरातून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. पण राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नादाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचं टार्गेट चुकीचं ठरतंय.”
 
ते म्हणाले, “संजय राऊत आता अर्बन नक्षलसारखी भाषा करत आहेत. ते कोणाच्या तालावर बोलतात हे सर्वांनाच माहिती आहे.”
 
उबाठाकडे उमेदवारच नाहीत-
महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, जर युतीतील लढत समन्वयाने झाली, तर त्याचा फायदा महायुतीलाच होईल. पण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव ठाकरेंकडे उमेदवारच नाहीत.नितेश राणे यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही एकाच वेळी लक्ष्य केल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे.