- मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मशक्कत!
Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक ४४ वर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. वाघोली गावाजवळ एका वेगात धावणाऱ्या नॅनो कारने रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या पादचारीस जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील किशोर हरिभाऊ उमाडे (वय ३८) हे रविवारी पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास महामार्गाच्या कडेला मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या नॅनो कारच्या चालकाने नियंत्रण गमावून त्यांना जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की उमाडे यांचा मृतदेह कारखालीच अडकला.
शव बाहेर काढण्यासाठी पोलिस आणि स्थानिक नागरिकांना मोठी मेहनत घ्यावी लागली. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
कन्हान पोलिसांनी नॅनो कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.