यंदा दिवाळीचा गोंधळ संपला;आज २० ऑक्टोबरलाच होणार लक्ष्मीपूजन, काशी विद्वत परिषदेचा निर्णय

    20-Oct-2025
Total Views |
 
Lakshmi Pujan Diwali
 Image Source:(Internet)
मुंबई :
यंदा दिवाळी (Diwali) नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची — २० की २१ ऑक्टोबर — या प्रश्नावर देशभरात चर्चा रंगली होती. विविध पंचांगांतील तिथींच्या फरकामुळे निर्माण झालेला हा गोंधळ अखेर काशी विद्वत परिषदेने दूर केला आहे. परिषदेने शास्त्राधारित गणनांनुसार स्पष्ट सांगितले आहे की, यावर्षीचा मुख्य दिवाळी सण २० ऑक्टोबर २०२५ (सोमवार) रोजीच साजरा करावा.
 
काशीतील धर्मशास्त्र व ज्योतिष विषयातील प्राध्यापकांनी एकत्र येऊन या विषयावर सखोल चर्चा केली. त्यांच्या गणनापद्धतीनुसार प्रदोषकाळ व्यापिनी अमावस्या तिथी केवळ २० ऑक्टोबरलाच प्राप्त होत आहे, तर दुसऱ्या दिवशी वृद्धिगामिनी प्रतिपदा सुरू होते. त्यामुळे २१ ऑक्टोबर हा लक्ष्मीपूजनासाठी शुभ नसल्याचं परिषदेचं म्हणणं आहे.
 
मागील वर्षी २०२४ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. काही पंचांगांतील गणनांमधील सूक्ष्म फरकांमुळे दोन वेगवेगळ्या तारखा सांगितल्या गेल्या होत्या. परंतु, काशी विद्वत परिषदेच्या भूमिकेनुसार देशभर एकाच दिवशी दिवाळी साजरी करण्यात आली होती.
 
द्रिक पंचांगानुसार यंदा अमावस्या तिथी २० ऑक्टोबर दुपारी सुरू होऊन २१ ऑक्टोबरच्या रात्री संपेल. लक्ष्मीपूजनासाठी सर्वोत्तम काळ संध्याकाळी ७.०८ ते ८.१८ असा आहे. हा काल प्रदोषकाळ व स्थिर लग्नाचा संयोग असलेला असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान गणेश पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
 
काशी विद्वत परिषदेने सर्व श्रद्धाळूंना आवाहन केलं आहे की, २० ऑक्टोबरलाच दिवाळी आणि लक्ष्मीपूजन साजरं करावं, कारण हाच दिवस शास्त्रसिद्ध, मंगल आणि समृद्धीप्राप्तीसाठी सर्वाधिक योग्य आहे.