Image Source:(Internet)
मुंबई:
राज्यातील महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकारने आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Majhi Ladki Bhaeen scheme) विस्ताराखाली महिलांना आता व्यवसाय सुरू करण्यासाठी शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या नव्या तरतुदीमुळे महिलांच्या उद्योजकतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावर करत महिलांना दिलासा दिला आहे. सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये या कर्जयोजनेचा प्रायोगिक प्रारंभ झाला असून, लवकरच ती राज्यभर विस्तारली जाणार आहे.
‘माझी लाडकी बहीण’ ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी सुरू केली होती. योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 सन्माननिधी देण्यात येतो. आता त्यात आणखी एक महत्त्वाची भर टाकत महिलांना स्वरोजगारासाठी व्याजमुक्त कर्जाची सुविधा देण्यात आली आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३ सप्टेंबरपासून या योजनेअंतर्गत कर्जवाटपास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ५७ महिलांना आर्थिक सहाय्य मिळालं असून, त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी भांडवल देण्यात आलं आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले.
तटकरे म्हणाल्या, “ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर महिलांच्या आत्मनिर्भरतेचा प्रवास पुढे नेणारी चळवळ आहे. सरकार त्यांना स्थिर उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचं साहाय्य देईल.”
महिलांना व्यवसाय उभारणीत मदत व्हावी म्हणून सरकारने ‘मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट मल्टी-सर्व्हिस सेंटर’ सुरू केलं आहे. येथे महिलांना व्यवसाय नियोजन, मार्केटिंग, ब्रँडिंग, विक्री कौशल्य आणि उद्योग व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
याशिवाय, योजनेअंतर्गत ‘विशेष महिला कक्ष’ सुरू करण्यात आला आहे, जिथे महिलांना विविध शासकीय योजना, उद्यमसंधी आणि आर्थिक सहाय्याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळेल.
या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.