व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या, उद्धव-राज ठाकरे यांची ठाम मागणी; निवडणूक आयोगावर दबाव वाढला!

    15-Oct-2025
Total Views |
 
Uddhav AND Raj Thackeray
 Image Source:(Internet)
मुंबई:
राज्यातील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार दबाव टाकला. शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह अनेक पक्षांचे नेते आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांच्या जोरात थकवून टाकत दिसले. मतदार याद्या, व्हीव्हीपॅट आणि निवडणूक प्रक्रियेवरील शंका चर्चेचा मुख्य विषय राहिल्या.
 
उद्धव ठाकरे यांनी आयोगाला थेट म्हटले की, "व्हीव्हीपॅट न घेतल्यास निवडणुकीचे सर्व पुरावे नष्ट होतात. सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा." त्यांनी ठामपणे सांगितले की, "जर व्हीव्हीपॅट नसतील तर थेट बॅलेट पेपरवर मतदान करा."
 
राज ठाकरे यांनी मतदार याद्यांतील विसंगतीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, "बाळासाहेब थोरात ८०-९० हजार मतांनी जिंकत होते, तर यंदा लाखोंचा फरक कसा?" या प्रश्नाला आयोगाचे अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांनी पुढे म्हटले की, "मतदार याद्यांमध्ये गडबड असल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करा आणि निवडणूक पुढे ढकला."
 
आजच्या बैठकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार अनिल देसाई, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, बाळा नांदगावकर, जितेंद्र आव्हाड यांसह अनेक बडे नेते उपस्थित होते.
 
गेल्या तासाभरापासून चालू असलेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या प्रश्नांमुळे आयोगाचे अधिकारी सतत गोंधळलेले दिसत आहेत. कालही शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना प्रश्नांच्या झोडपात पकडले होते, तर आज आयुक्त वाघमारे यांच्यावर तीच प्रक्रिया पुन्हा झाली.