देशभरात विषारी कफ सिरपचा कहर; यवतमाळमध्ये चिमुकल्याचा मृत्यू, चौकशीला गती

    13-Oct-2025
Total Views |
 
Poisonous cough syrup Child dies
 Image Source:(Internet)
यवतमाळ :
देशभरात पुन्हा एकदा विषारी कफ सिरपचे (Poisonous cough syrup) सावट गडद होताना दिसत आहे. मध्य प्रदेशात अनेक लहान मुलांचे मृत्यू घडवणाऱ्या या भेसळयुक्त औषधाने आता महाराष्ट्रालाही झटका दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपळखुटी गावात केवळ 6 वर्षांच्या बालकाचा खोकल्याचे औषध घेतल्यानंतर मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
मृत मुलाचे नाव शिवम सागर गुरनुले असे असून, त्याला सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. उपचारासाठी त्याला स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनंतरही प्रकृती सुधारली नाही, उलट त्याची तब्येत अधिकच बिघडली. अखेर त्याला वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले.
 
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने तत्काळ कारवाई करत संबंधित मेडिकलमधील औषधांचे नमुने जप्त केले आहेत. सध्या पाच औषधांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या औषधांचा वापर आणि विक्री तातडीने थांबवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
 
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी सांगितले, “बालकाला दिलेल्या सात औषधांची यादी प्राप्त झाली असून सर्व नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होईल.”
 
या घटनेबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “सदर कफ सिरप महाराष्ट्रात तयार झालेले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषींना निश्चित शिक्षा दिली जाईल. याशिवाय विक्रेत्यांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध न देण्याच्या कठोर सूचना दिल्या जातील. तसेच बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारलाही अहवाल सादर केला जाईल.”
 
या प्रकारामुळे पालक आणि नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. भेसळयुक्त औषधांच्या वाढत्या घटनांमुळे औषध नियमन प्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने मात्र दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.