Image Source:(Internet)
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आता मोठ्या पडद्यापलीकडे आपला नवा प्रवास सुरू करतो आहे. अभिनयातील विविधतेनंतर तो आता निर्मात्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. हृतिक लवकरच ‘प्राइम व्हिडिओ’ या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ‘एचआरएक्स फिल्म्स’ या आपल्या निर्मिती संस्थेमार्फत एक वेब सीरिज सादर करणार आहे.
या वेब सीरिजचं नाव ‘स्टॉर्म’ असं ठेवण्यात आलं असून तिचं दिग्दर्शन अजितपाल सिंग करतील. कथालेखनाचं काम त्यांनी फ्रान्स्वा लुनेल आणि स्वाती दास यांच्या सोबत पूर्ण केलं आहे. या प्रकल्पाचे निर्माते म्हणून हृतिकसोबत त्याचा भाऊ ईशान रोशन देखील सहभागी आहे.
या मालिकेत पार्वती थिरुवोथू, अलाया एफ, सृष्टी श्रीवास्तव, रमा शर्मा आणि सबा आझाद हे कलाकार झळकणार आहेत. मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित हा एक थरारक ड्रामा असल्याचं समजतं. या कथेत गुंतागुंतीची पात्रं, भावनिक गाठ आणि वास्तववादी मांडणी असेल.
नव्या भूमिकेबद्दल बोलताना हृतिक म्हणाला, “‘स्टॉर्म’ माझ्यासाठी एक नव्या दिशेचा प्रवास आहे. निर्माता म्हणून या कथेत सामील होणं मला एक वेगळी प्रेरणा देतं आहे. अजितपाल सिंग यांनी उभं केलेलं जग वास्तववादी आणि मनाला भिडणारं आहे. या कथेतली प्रामाणिकता आणि सखोलता मला खूप आवडली.”
हृतिकच्या या निर्मिती पदार्पणाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सर्वांना त्याच्या ‘स्टॉर्म’ मालिकेतून येणाऱ्या नव्या वाऱ्याची आतुरतेने प्रतीक्षा आहे.