मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा; फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचा जोरदार प्रत्युत्तर

    11-Oct-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray Hambarda Morcha
 Image Source:(Internet)
नागपूर:
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती संभाजी नगर येथे हंबरडा मोर्चा काढला. या मोर्चावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी १ लाख रुपयांची मदत जमा करण्याचे आव्हान दिले.
 
मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी स्वतः काय पाहायचं हे त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे.”
 
मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितले, “मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा. आपणच म्हणताय की ‘असा प्रकार कधी झाला नाही’, पण मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये जे अधिवेशन झाले तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. तरीही मी शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत पीक कर्जमुक्ती जाहीर केली होती. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. २०१७ मध्ये जाहीर केलेली कर्जमुक्ती अजूनही सुरू आहे.”
 
ठाकरेंनी पुढे सांगितले, “शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांना कमीत कमी ५० हजार रुपये मिळावेत. मागील हंगामाचे कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. पीक हाती लागले असते तर कर्जाची थोडीफार परतफेड होण्याची संधी होती. आता जमीन पूर्ववत करून देणे आणि कर्जमाफी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.”
 
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरही भाष्य केले. “पंतप्रधानांचे दौरे सुरू असताना शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत त्यांना माहिती होती की नाही, हे गूढ आहे. शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले, म्हणजे त्यांच्या तोंडाला पुसण्यासाठी नव्हे, तर खरी मदत मिळावी,” असे ते म्हणाले.