नागपुरात ट्रॅव्हल्स बसचालकांना झटका; इनर रिंग रोडवर पार्किंग, पिकअप-ड्रॉपला सक्त मनाई!

    11-Oct-2025
Total Views |
 
Inner Ring Road in Nagpur
 Image Source:(Internet)
नागपूर :
वाहतूक कोंडी, अडथळे आणि नागरिकांच्या सततच्या तक्रारींचा विचार करून नागपूर शहर वाहतूक विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. इनर रिंग रोड (Inner Ring Road) परिसरात आता सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत खाजगी ट्रॅव्हल्स बसना रस्त्यावर पार्किंग, तसेच प्रवाशांचे पिकअप आणि ड्रॉप करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 
हा निर्णय पोलीस उपआयुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असून, त्याबाबतची अधिसूचना क्रमांक पोउपआ/वावि/नागपूर/ट्रॅव्हल्स बस अधिसूचना/3632/2025 दिनांक 12 सप्टेंबर 2025 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
पोलिसांच्या repeated सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक ट्रॅव्हल्स चालक अजूनही रस्त्याच्या कडेला बस उभ्या करतात किंवा प्रवाशांना रस्त्यावरच चढ-उतार करतात. अशा चालकांवर आता मोटार वाहन कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
 
याशिवाय, वारंवार नियम तोडणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या परमिट रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून, अशा वाहनांची जप्तीची कारवाईही सुरू केली जाईल.
 
डीसीपी लोहित मतानी यांनी सर्व ट्रॅव्हल्स चालकांना वाहतूक शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीच्या सुव्यवस्थेसाठी नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात येईल.”