प्रतिक्षा संपली...आता जमीन मोजणी फक्त ३० दिवसांत, महसूल विभागाचा निर्णय !

    11-Oct-2025
Total Views |
 
Land census Revenue Department
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील जमीन मोजणी (Land census) प्रक्रिया आता जलदगतीने पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने महसूल विभागाद्वारे जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, आता मोजणीसाठी नागरिकांना सहा महिने वाट पाहण्याची गरज नाही; काम फक्त ३० दिवसांत पूर्ण होईल.
 
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि. ११) याबाबत माहिती दिली. राज्यातील शेतकरी, जमीनधारक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी ही मोठी सोय आहे. अधिसूचनेनुसार, आता पोटहिस्सा, हद्द कायम करणे, बिगरशेती जमिनीसाठी नोंदणी, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन, सिमांकन आणि मालकी हक्कासाठी आवश्यक सर्व मोजणी कामे ३० दिवसांत पूर्ण होणार आहेत.
 
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार, प्रत्येक घरासाठी प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबवताना जमीन मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आवश्यक होते. यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नेमणूक केली जाईल, आणि नंतर महसूल विभागाचे अधिकारी त्याची प्रमाणीकरण करणार आहेत.
 
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लाखो जमीन मोजणी प्रकरणांचा वेगवान मार्गी निपटारा होईल. नागरिकांना जलद, अचूक आणि पारदर्शक मोजणी सुविधा मिळणार असल्यामुळे जमीन व्यवहारात होणारे वाद आणि गोंधळ कमी होणार आहेत.