Image Source:(Internet)
नागपूर:
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा (Ladki Bahin Yojana) सप्टेंबरचा हप्ता राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ही रक्कम महिलांसाठी खास भेट ठरली आहे.
अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही महिलांना हा हप्ता वेळेवर मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला यासाठी ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत १ कोटी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, ज्या महिलांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनाही यावेळचा हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक-
या योजनेसाठी आता ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. दरवर्षी लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
केवायसी करताना फक्त अधिकृत संकेतस्थळावरच प्रक्रिया पूर्ण करावी:
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
गैरअधिकृत फेक वेबसाईट्सपासून सावध रहा, जसे की https://hubcomuat.in/. अशा फेक साइट्सवरून डेटा चोरी होऊ शकतो.
केवायसी करताना येणाऱ्या अडचणी-
ओटीपी न येणे: काही लाभार्थ्यांना OTP येत नसल्यामुळे KYC पूर्ण करण्यात अडचण येत आहे.
आधार नंबरची समस्या: पती किंवा वडिलांचा आधार नंबर आवश्यक असला तरी काही महिलांसाठी हा आधार उपलब्ध नसतो, ज्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत.
वेबसाईट एरर: लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट काही वेळा ठप्प होत असल्याचे दिसत आहे.
ई-KYC प्रक्रिया कशी करावी?
मुख्य संकेतस्थळ उघडा आणि मुखपृष्ठावर e-KYC बॅनरवर क्लिक करा.
आधार क्रमांक व Captcha कोड टाकून Send OTP क्लिक करा.
आधार-लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Submit करा.
जर e-KYC आधीच पूर्ण झाली असेल, तर ‘e-KYC आधीच पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.
नविन लाभार्थ्यांसाठी पती/वडिलांचा आधार क्रमांक, जात प्रवर्ग व कुटुंबीयांची माहिती भरा.
प्रमाणित (Declaration) करून Submit करा.
यशस्वी झाल्यास ‘Success - तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.
केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ नियमित मिळत राहील. दिवाळीच्या आधी थेट खात्यात जमा झालेला हा हप्ता महिलांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.