Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Day) मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षी पाच ते सहा लाख अनुयायी येथे दाखल होतात. मात्र, यावर्षी हा आकडा आठ ते नऊ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, प्रशासनाने कडक तयारी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून २ ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका, निटा, परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, वीज मंडळ आणि पोलिस दलाने संयुक्तरीत्या कामाला सुरुवात केली आहे. बाहेरून येणाऱ्या अनुयायांसाठी दीक्षाभूमी परिसरातील शाळा तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेऊन निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
डीसीपी एस. ऋषिकेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा १२ ते १५ लाख अनुयायी नागपूरात येऊ शकतात. गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन १२०० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एसआरपीच्या दोन तुकड्या, वाहतूक व्यवस्थेसाठी २०० कर्मचारी, तसेच १०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने परिसरावर काटेकोर नजर ठेवली जाणार आहे. बंदोबस्त चार सेक्टरमध्ये विभागण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालच्या पातळीपर्यंत पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
सध्या देखील अनुयायांचा ओघ सुरू झाला असून, विजयादशमीच्या दिवशी विक्रमी गर्दी उसळेल, असा अंदाज आहे. पावसाच्या शक्यतेचा विचार करून राहण्याची आणि इतर आवश्यक सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी त्रिशरण व पंचशील स्वीकारून लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मृती म्हणून दरवर्षी लाखो अनुयायी दीक्षाभूमीत बाबासाहेबांना अभिवादन करतात. यावर्षी या संख्येत अभूतपूर्व वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.