एस टी चालक-वाहकाचे सतर्कतेने वाघापासून वाचले सायकल स्वाराचे प्राण?

    27-Jul-2024
Total Views |
 
Tiger
 
ब्रम्हपुरी :
काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती या म्हणी प्रमाणे रस्त्याने एकटेच जात असलेल्या एका सायकल स्वाराच्या अगदी पुढे एक मोठा वाघ आला . वाघाने काही करायचे आता या दरम्यान या मार्गाने जात असताना लघु शंकेकरता रस्त्याच्या कडेला रिकामी बस उभी करून थांबलेल्या एस टी चालक-वाहकाने क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान लक्षात घेता तत्काळ त्या सायकल स्वराला बस मध्ये घेतले व त्याचे वाघापासून प्राण वाचवल्याची घटना घडली.या घटनेत त्या सायकल स्वरा करता एसटीचे चालक वाहक हे देवदूत ठरले.
 
सविस्तर वृत्ता नुसार ब्रम्हपुरी आगाराचे चालक विशाल मुलमुले व वाहक मनोज पत्रे यांची 23 जुलै ला बस क्रमांक MH06S8862 या वर सायंकाळी नागभीड ते सोनापूर अशी कामगिरी होती.मात्र सोनापूर च्या अलीकडेच पुलाचे काम सुरू असून लगतचा वळण रस्ता वाहून गेल्याने रस्ता बंद करण्यात आला असल्याने बस ही सोनापूर पर्यंत न जाता नागभीड ते गोविंदपुर अशी नियोजित फेरी पूर्ण करीत होते.सदर चालक वाहक बस घेऊन सायंकाळी पाच ते साडेपाच च्या दरम्यान नागभीड गोविंदपुर असा प्रवास करत असताना मांगरूळ-गोविंदपुर दरम्यान गोविंदपुरच्या एक किलोमीटर आधीच बसमध्ये कोणी प्रवासी नसल्याचे पाहून चालक वाहकाने लघुशंकेकरता बस रस्त्याच्या कडेला थांबवली. याच वेळेस यशवंत तीमाजी खानदेवे वय 60 रा गोविंदपुर हे सायकल ने मागवून येत उभ्या बस च्या पुढे निघाले.दरम्यान ते सायकलने 15 ते 20 फूट अंतर पुढे जात नाही तर त्यांचे समोर काही अंतरावर वाघ आला.वाघ बघून सायकल स्वार घाबरले व जागेवरच थांबले. या अतीप्रसंगी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उभ्या बसचे चालक-वाहक यांनी वेळ न दवडता लगेच बसचे दार खोलून तत्काळ सायकल स्वार यशवंत खानदेवे यांना सायकल सोडून बस मध्ये घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
 
थोडा वेळ वाघ तिथेच उभा होता नंतर निघून गेला.काही वेळाने मंगरूळ कडून काही गोविंदपूर गावकरी मोटरसायकलने आले त्यांच्यासोबत यशवंत खानदेवे सायकल घेऊन पुढे निघाले त्यांचे पाठोपाठ चालक वाहकाने आपली बस लावली व त्या सर्व लोकांना सुरक्षित गोविंदपुर गावापर्यंत सोडून दिले. एसटी बस चालक श्री विशाल मुलमुले व वाहक श्री मनोज पत्रे यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.