रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती आतापर्यंत बुजविले ९६८ खड्डे

    27-Jul-2024
Total Views |
 
potholes
 
नागपूर :
पावसामुळे नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आलेली आहे. मागच्या दहा दिवसात मनपाच्या दहाही झोनमध्ये यंत्रेणेने ९६८ खड्डे (५६०२ चौ.मी.) बजुवली आहे. या कामात इंस्टा व जेट पॅचरचा सुध्दा वापर करण्यात आला आहे.
 
मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार, हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी विशेष चमू देखील गठीत करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात सुसूत्रता यावी व वेळेत खड्डे बुजविले जावेत याकरिता प्रत्येक झोन स्तरावर समन्वयक नेमून त्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. यासाठी साप्ताहिक वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून पाच पाच झोनमध्ये खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे. २३ ते २५ जुलै २०२४ या कालावधीमध्ये मंगळवारी, धंतोली, गांधीबाग, आशीनगर आणि लकडगंज या पाच झोनमधील खड्डे बुजविण्यात आले. तर २६, २७ आणि २९ जुलै २०२४ या कालावधीत धरमपेठ, सतरंजीपुरा, नेहरूनगर, लक्ष्मीनगर आणि हनुमान नगर झोनमधील खड्डे बुजविण्याबाबत कार्य सुरू झाले आहेत. सुरळीतपणे खड्डे बुजविण्याबाबत कार्यवाही व्हावी याकरिता प्रत्येक झोनमध्ये उपअभियंता यांना समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
नागपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पावसामुळे आणि जड वाहतुकीमुळे मोठे खड्डे तयार झाले आहेत. दहाही झोन अंतर्गत वस्त्यांमधील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासाठी हॉट मिक्स प्लॉंट विभागाद्वाने मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ९६८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. ही माहिती कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी दिली.