नगर परिषद उर्दु शाळेत ११ वी, १२ वीचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करा!

    27-Jul-2024
Total Views |
- नगर परिषद मुख्याधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समितीचे निवेदन

Nagar Parishad 
चांदूर रेल्वे:
शहरातील नगर परिषद मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू पुर्व माध्यमिक व माध्यमिक शाळेत ११ वी, १२ वीचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करा अशा मागणीचे निवेदन शाळा व्यवस्थापन समितीने न.प. मुख्याधिकारी यांना दिले.
 
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनातर्फे विशेष लक्ष दिले जाते. असे असतांना चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील उर्दु माध्यमाचे विद्यार्थी मात्र महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहत आहे. चांदूर रेल्वे शहरात दोन हजाराच्या जवळपास मुस्लीम समाजाची लोकसंख्या आहे. याशिवाय ग्रामिण भागातही मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. शहरात स्थानिक नगर परीषद व्दारा संचालित मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू पुर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा असून येथे केवळ दहावीपर्यंत उर्दु माध्यमाचे शिक्षण आहे. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अमरावती, कुऱ्हा, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर याठिकाणी जावे लागते. परंतु परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकत नाही.
 
अनेकवेळा निवेदने देऊन उर्दु माध्यमाचे ११ वी, १२ वी चे शिक्षण सुरू करण्याची मागणी केली होती. अशातच ९ ते १० वर्षांपुर्वी एक वेळा यासंदर्भात नगर परीषदमध्ये ठराव घेण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी पुढे झालेली नाही. त्यामूळे नगर परिषद उर्दू शाळेतच उर्दू माध्यमाचे अकरावी व बारावीचे महाविद्यालयीन शिक्षण तत्काळ सुरू करावे तसेच याकरिता लागणाऱ्या नव्या वर्ग खोल्या व शिक्षक वर्गाची सुध्दा व्यवस्था करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन सदर शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीने मुख्याधिकाऱ्यांना दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नुरूलहसन कुरैशी, उपाध्यक्ष नाज परवीन, सदस्य फिरोज मुल्ला, नवाज अहमद, शे. गफ्फार, अकिला परवीन, सुलताना परवीन आदींची उपस्थिती होती. या निवेदनाची प्रतिलिपी आमदार प्रताप अडसड यांना दिली.