मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी मिशन मोडवर करा

    26-Jul-2024
Total Views |
Majhi Ladki Bahin Yojana
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) अधिक गतिमान करण्यासोबतच नोंदणीचे काम कालमर्यादेत पुर्ण करण्याची गरज आहे. याद्या अचूकतेची दक्षता घेण्यात यावी तसेच अर्जांची पडताळणी मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
तालुकास्तरावर आनलाईन अर्जाची पडताळणी करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावरील लॅाग इन मिळाले आहेत. त्यानुसार तालुका स्तरावर तहसिलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी मिळून लॅाग इन करून अर्जांची अचूक पडताळणी करावी. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी व अंगणवाडी सेविका यांनी अर्जांची पडताळणी करावी. ग्रामीण भागातील यादी ही तालुका स्तरावरून जिल्हास्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. इटनकर यांनी यावेळी दिले.
 
जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावा-गावात कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांचे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने अर्ज स्विकारले जात आहेत. जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेत आपले अर्ज सादर करावे तसेच महिलांनी ऑफलाईन अर्ज भरताना आधारकार्डनुसार बिनचूक माहिती भरावी. नारीशक्तीदूत ॲपमध्येही आधारकार्डानुसार माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.