कौटुंबिक घटनाक्रमाची सुरेख विनोदी गुंफण

    26-Jul-2024
Total Views |
- टाळ्या, हशाने सभागृह दणाणले
- ‘मरता क्या न करता!’ नाटकाला अभूतपूर्व प्रतिसाद

comedy play 
नागपूर :
महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी, प्रयास बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि तेजस्विनी महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मरता क्या न करता’ या दोन अंकी विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटकात कौटुंबिक घटनाक्रमकाची सुरेख विनोदी गुंफण करण्यात आली. दोन अंकी नाटकादरम्यान रसिकांना खिळवून ठेवण्यात, तसेच हसविण्यात यशस्वी ठरले.
 
या नाट्य प्रयोगात आयटी क्षेत्रातील जोडप्याच्या कुटुंबात होणारे कथानक व घटनाक्रम यांची सुरेख गुंफण केली आहे. नाटकाचा प्रवाह जसा पुढे जातो तसे प्रासंगिक विनोद रसिकांना आनंद देऊन गेले. नाटकाचे नेपथ्य व सर्व पात्रांनी आपापल्या भूमिकांना दिलेला हृदयस्पर्शी न्याय ही या नाटकाची जमेची बाजू ठरली.
 
नाटकाच्या कथानकात घरोघरी नित्य रुपात घडणार्‍या घटनांचा सुरेख मिलाप रसिकांना दाद देण्यास भाग पाडणारा ठरला. नाटकाचे संगीत दिग्दर्शन आणि प्रसंगानुरूप हिंदी चित्रपटातील गीतांची पेरणी रसिकांना भावल्याचे नाट्यगृहात सातत्याने जाणवत होते. नाटकाचे संवाद आणि पटकथा, त्यात प्रसंगानुरूप पात्रांच्या तोंडी दिलेले मराठी वाक्प्रचार या प्रयत्नामुळे हिंदी नाटकात मराठी रसिक देखील उत्स्फूर्त दाद देताना दिसले.
 
नाटकाचे लेखन, दिग्दर्शन प्रियंका शक्ती ठाकूर यांनी केले. सहनिर्माती डॉ. सोना जेसवानी, तर सहदिग्दर्शन रुचिता चिलबुले यांचे होते. संगीत नियोजन अनिल इंदाणे, रंगभूषा लालजी श्रीवास, प्रकाशयोजना शिवशंकर माळोदे, तर नेपथ्य स्वप्निल बोहटे यांचे होते. सूत्रसंचालन डॉ. विजेंद्र बत्रा यांनी केले.
 
नाटकात शांतनू ठेंगडी (शंतनू), अंकिता पोहरकर (अंकिता), प्रणाली राऊत (सख्खूबाई), सौरभ मसराम (बॉस लवली सिंग), निकिता ठाकूर (सीमरन), अश्विनी मांडवकर (प्रिया), रौनक पळसापुरे (सचिन), शृतिका निकोडे (सोना) या कलाकारांनी आपल्या भूमिका अतिशय उत्कृष्ठ वठविल्या.
 
नाटकाला महिला आघाडी अध्यक्षा प्रगती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सविता मते, किरण मुंदडा, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. शीतला प्रसाद दुबे, हिंदी साहित्य अकादमीच्या अध्यक्षा प्रियंका ठाकूर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व मराठी व हिंदी नाट्यक्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार करण्यात आला. नाटकाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती.