पंजाबमधील महिलांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाची योजना

    25-Jul-2024
Total Views |
bhagwant man
 (Image Source : Internet/ Representative)
अमृतसर :
राज्यातील गरजू महिलांना तात्काळ आणि आपत्कालीन मदत मिळावी, यासाठी पंजाब सरकारने नवीन योजना काढली आहे. पंजाबच्या सामाजिक सुरक्षा, महिला आणि बाल विकास विभागामार्फत महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक १८१ योजना आणण्यात आली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा, महिला व बालविकास मंत्री डॉ. बलजीत कौर यांनी माहिती दिली.
 
पंजाब सरकारने महिला हेल्पलाइन क्रमांक १८१ ही योजना राज्यातील गरजू महिलांना तात्काळ आणि आपत्कालीन मदत देण्यासाठी आणली आहे. पंजाब सरकारचा हा चांगला प्रयत्न असून महिलांना यामुळे २४ तास तात्काळ सेवा आणि आपत्कालीन मदत प्रदान केली जाईल. कोणत्याही महिलेवर अन्याय किंवा हिंसाचार होत असेल, तर ती महिला हेल्पलाइन क्रमांक १८१ वर फोन करून मदत मागू शकते, असे बलजीत कौर यांनी सांगितले. या क्रमांकावर दररोज सुमारे १५० कॉल येत असून दर महिन्याला ४ ते ५ हजार महिलांना मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोणतीही महिला अन्याय किंवा अत्याचाराचा सामना करत असेल, तर या क्रमांकावर मदत मागू शकतात. महिला वर्गाचे सर्व प्रकारे संरक्षण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या. या योजनेला भविष्यात सरकारच्या महिला सक्षमीकरणाशी जोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार महिलांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे गरजू महिला आणि मुलींना दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.