पुण्यात हाहाकार! ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    25-Jul-2024
Total Views |
- जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी
- विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू
- दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला
 
Life disrupted due to cloudburst like rain in pune
 (Image Source : Internet)
 
पुणे :
मुंबई ते पुण्यापर्यंत संततधार पावसाने कहर केला आहे. पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. पावसाचा जोर वाढल्याने संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील अनेक घरात सध्या पाणी शिरले असून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुण्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तसेच पुण्यात पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात सध्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
 
हवामान खात्याने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. तसेच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश भागातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक भागात पुरजन्या परिस्थीती निर्माण झाली असून पुरात अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या जवानांकडून बाहेर काढले जात आहे.

अनेक धरणांच्या पाणीपातळीत वाढ
 
पुणे शहरासह जिल्ह्याच्या इतर भागांसह वेल्हा, मुळशी, भोर तालुका आणि खडकवासला येथील अनेक धरणांतील पाणीपातळी वाढल्याने परिस्थिती बिकट आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे 35 हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असून तो आणखी वाढून 45 हजार क्युसेक होणार आहे. पाणी सोडल्याने मुठा नदीकाठच्या अनेक सखल भागात पूर आला. याशिवाय पिंपरी चिंचवड शहरातही पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मोरया गोसावी मंदिर पाण्यात बुडाले आहे.
 
 
विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुण्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील डेक्कन परिसरात मुसळधार पावसामुळे एका अंडी विक्रेत्याने आपली गाडी हलवण्याचा प्रयत्न केला असता त्याला विजेचा धक्का बसला आणि त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर, मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.
 
 
लष्कराचे पथक सतर्क - मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
 
महाराष्ट्रातील अनेक भागातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्यही समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगितले. लोकांची घरे जलमय झाली असून रस्त्यावर पाणी साचले आहे. धरण पावसाच्या पाण्याने भरले असल्यामुळे सर्वत्र पाणी वाहत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, SDRF आणि NDRF सह सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिला आहेत.
 
 
मी लष्कराचे मेजर जनरल अनुराग विज यांच्याशीही बोललो आहे. कर्नल संदीप यांच्याशी बोलून त्यांच्या टीमला सतर्क राहण्यास सांगितले आहे. नौदल, लष्कर आणि वायुदलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. लोकांना एअरलिफ्ट करण्याचीही तयारी करण्यात आली आहे. प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
 
'या' जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी
 
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी आज पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यांसाठी २६ जुलैला ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.