ऑलिंपिकमध्ये अधिक पदकांची अपेक्षा

    25-Jul-2024
Total Views |

Olympics 2024
 (Image Source : Internet)
 
 
उद्यापासून म्हणजे २६ जुलै पासून फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरात ऑलिंपिक ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑलिंपिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे म्हणूनच ऑलिंपिक स्पर्धेला खेळाचा कुंभमेळा म्हणतात. कारण ऑलिंपिकमध्ये सर्वच प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. दर चार वर्षांनी ही स्पर्धा खेळवण्यात येते. जगभरातील सर्वच देश या खेळाच्या कुंभमेळ्यात सहभागी होतात.
 
मागील वर्षी ही स्पर्धा जपानची राजधानी असलेल्या टोकियो या शहरात खेळवली गेली होती. या वर्षी पॅरिसमध्ये ही स्पर्धा होणार असून जगभरातील १० हजारांहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या ऑलिंपिकमध्ये खेळाडू पदक जिंकून आपल्या देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात चमकवण्यासाठी जीवाचे रान करतील. भारताचे खेळाडू देखील आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यासाठी मैदानात घाम गाळतील. भारताच्या पथकात ११३ खेळाडू असून त्यांना मदत करण्यास तितकेच किंबुहूना त्याहून अधिक सपोर्ट स्टाफ आहे.
 
मागील वेळेस म्हणजे २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती चांगली कामगिरी या अर्थाने की टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने जितकी पदके जिंकली तितकी पदके त्या आधी कोणत्याही ऑलिंपिकमध्ये भारताला मिळाले नव्हते. भारताच्या या खेळाडूंनी टोकियो ऑलिंपिकपेक्षाही अधिक पदके या ऑलिंपिकमध्ये मिळवावीत, अशी अपेक्षा देशातील १४० कोटी देशवासीयांची आहे. अर्थात खेळाडूंनीही त्यासाठी कठोर सराव केला आहे. भारत सरकारनेही खेळाडूंना सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा देण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंनीही मेहनत घेऊन आपला फॉर्म टिकवला आणि ऑलिंपिकचे तिकीट मिळवले.
 
देशासाठी पदक मिळवावे हेच या खेळाडूंचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली आहे. या खेळाडूंच्या पाठीशी देशातील १४० कोटी देशवासीयांच्या शुभेच्छा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. १४० कोटी देशवासीयांना या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आहे आणि त्यात ते यशस्वी होऊन जास्तीत जास्त पदकांची लयलूट करून देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करतील यात शंका नाही.
 
ऑलिंपिकमध्ये भारताला आजवर म्हणावे तसे यश मिळाले नाही. ऑलिंपिकमध्ये जगातील इतर राष्ट्र पदकांची लयलूट करत असताना भारताला मात्र बोटावर मोजता येतील इतकेच पदके मिळाली आहेत. भारताला सर्वाधिक पदके राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी हा खेळाने मिळवून दिली आहेत. पण अलीकडे भारतीय हॉकी संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. नाही म्हणायला मागील टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले होते मात्र मागील वर्षात भारतीय हॉकी संघाने कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाही असे असले तरी देशवासीयांचा भारतीय हॉकी संघावर विश्वास असून यावेळी भारतीय हॉकी संघ आपल्या पदकाचा रंग बदलतील असा विश्वास देशवासीयांना आहे.
 
वैयक्तिक क्रीडा प्रकारात तर भारताला हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच पदके मिळाली आहेत. वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक जिंकून दिले होते ते कुस्ती या खेळाने. १९५२ सालच्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदकांचा दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ संपला तो थेट १९९८ साली. यावर्षी झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत लिएंडर पेस याने टेनिसमध्ये कांस्य पदक मिळवले. त्यानंतर प्रत्येक ऑलिंपिकमध्ये भारताला दोन किंवा तीन पदके मिळत गेली. भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात आजवर फक्त दोन सुवर्णपदक मिळाले आहेत.
 
२००८ साली बीजिंग येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये अभिनव बिंद्रा या नेमबाजाने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर थेट बारा वर्षांनी म्हणजे २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेकित सुवर्णपदक जिंकले. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त दोनच सुवर्णपदक असणे ही भूषणावह बाब नाही. भारताचा हा सुवर्ण पदकांचा दुष्काळ यावेळी तरी मिटेल अशी आशा देशवासियांना आहे. इतकेच नाही तर ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करून जास्तीतजास्त पदके मिळवतील अशी आशा आहे. कारण यावेळी भारतीय खेळाडू चांगलेच फॉर्मात आहे. हा फॉर्म असाच टिकवून भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तर पॅरिस ऑलिंपिक भारतासाठी ऐतिहासिक ठरेल.
 
क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी देखील या ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ मागील ऑलिंपिकपेक्षा अधिक जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे. कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजी, वेटलिफ्टींग, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बॅडमिंटन, भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताला सर्वाधिक पदके मिळतील अशी अपेक्षा आहे. भारतीय खेळाडू या अपेक्षा पूर्ण करून पॅरिस क्रीडा नगरीत भारताचा तिरंगा डौलाने फडकवतील यात शंका नाही. भारतीय संघाला शुभेच्छा!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.