छत्तीसगडमध्ये १०० कोटींची फसवणूक

    25-Jul-2024
Total Views |
fraud
(Image Source : Internet/ Representative)
 
राजनांदगाव :
छत्तीसगड जिल्ह्यात क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली १०० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. न्यायमूर्ती एनके व्यास यांच्या एकल खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, राजनांदगाव जिल्ह्यातील कंपाउंडर सुशील साहू नामक व्यक्तीने कोरोनामध्ये त्याची नोकरी गमावली होती. त्यानंतर त्याने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डमी ॲप तयार केले. त्याच्या टीममध्ये चार्टर्ड अकाऊंटंट आणि निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचाही समावेश होता. त्याने छत्तीसगडसह आणखी आठ राज्यांमध्ये त्यांचे नेटवर्क तयार केले. यामध्ये लोकांनी १०० कोटी रुपये गुंतवले होते.
 
गुंतवणूकदारांनी सुशील साहू यांना मुद्दलासह नफ्याची रक्कम परत मागितली असता सुशीलने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. याप्रकरणी राजनांदगाव व इतर पोलीस ठाण्यात त्रस्त गुंवणूकदारांनी तक्रार केली. त्यामुळे तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. जामीन मिळवण्यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर वकील अंकित सिंग यांनी आक्षेप घेत आरोपींचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले.