टपाल विभागाचे एजंट बनून 2.25 कोटींचा गंडा

    25-Jul-2024
Total Views |
- आरोपी महिला गजाआड, पती फरार

Crime 
नागपूर :
एका दाम्पत्याने टपाल विभागाचे एजंट बनून नागरिकांना 2.25 कोटी रुपयांचा गंडा घातला. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. पोलिसांनी नलिनी पुरुषोत्तम तांबुलकर (52) रा. महाजनवाडीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी महिलेला अटक केली आहे. मात्र तिचा पती फरार आहे. प्रदीप किसन खंगार (55) आणि वंदना प्रदीप खंगार (48) रा. रायपूर, हिंगणा असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रदीप हाच मास्टर माईंड असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, 2021 साली त्याने पत्नी वंदना हिला टपाल विभागात कलेक्शन एजंट बनवले. पती-पत्नीने लोकांना एफडी आणि आरडी योजनेचा लाभ सांगून पैसे गुंतविण्यास सांगितले. नलिनी यांच्यासह हिंगणा परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही लोकांना लाभ ही मिळाला आणि खंगार दाम्पत्यावरील लोकांचा विश्वास वाढला. याचा फायदा घेऊन खंगार दाम्पत्याने लोकांकडून आरडी आणि एफडीचे पैसे तर घेतले, मात्र खात्यांत जमा केले नाही. मुदत संपून ही लोकांना त्यांचे पैसे परत मिळाले नाही. त्यांनी खंगार दाम्पत्याकडे विचारणा केली असता लवकरच पैसे मिळण्याचे सांगून टाळाटाळ करू लागले. जवळपास महिनाभरापूर्वी प्रदीप अचानक घरून बेपत्ता झाला. पत्नीही त्याच्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगत होती.
 
चौकशीत वास्तविकता उघडकीस
लोकांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या खात्यांत पैसेच जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. नलिनी यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर इतरही लोक तक्रारीसाठी येऊ लागले. आतापर्यंत 85 गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार केली आहे. खंगार दाम्पत्याने सव्वादोन कोटींचा चुना लावल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पोलिसांनी वंदना ला अटक केली आहे. प्रदीप तक्रारीपूर्वीच फरार झाला होता. आतापर्यंत 85 जणांनी पोलिसात तक्रार केली आहे. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी फसवणुकीसह एमपीआयडी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. - विनोद गोडबोले, वपोनि हिंगणा पोलिस स्टेशन.