बोगस महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

    25-Jul-2024
Total Views |
- ॲक्युपंक्चर नॅचरोपॅथी क्लिनिकवर कारवाई

doctor
(Image Source : Internet/ Representative)
 
अमरावती :
कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शैक्षणिक पात्रता किंवा पदविका नसतानाही ॲक्युपंक्चर नॅचरोपॅथी क्लिनिक चालविणाऱ्या एका महिला बोगस डॉक्टरविरोधात खोलापुरी गेट पोलिसांनी 23 जुलै रोजी गुन्हा नोंदविला.
 
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, मुंबईच्या व्यवस्थापकाने बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या फिरोज खान असद खान यांना खोलापुरीगेट पोलीस ठाणे हद्दीतील एका बोगस महिला डॉक्टरची माहिती मिळाली होती. या महिला डॉक्टरकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शैक्षणिक पात्रता, डिप्लोमा किंवा पदवी नाही आणि ती सर्वसामान्यांवर ॲक्युपंक्चर नेचरोपॅथी उपचार करत होती. या माहितीवरून फिरोज खान यांनी मनपा आरोग्य विभागातील डॉ. रुपेश खडसे, डॉ. निगार खान आणि महिला कर्मचार्यासह साक्षीदाराना घेऊन 3 जुलै रोजी सदर बोगस डॉक्टरचे खोलापुरी गेट हद्दीतील क्लिनिक गाठले.
 
अनेक साहित्य आढळले
बोगस दवाखान्यावर सुजोग ॲक्युपंक्चर नॅचरोपॅथी क्लिनिक नावाचे बोर्ड लागले होते. ज्यावर मानदुखी, मज्जातंतू दुखणे, पाठदुखी, गॅप, फ्रॅक्चर किंवा शस्त्रक्रियेनंतरची दुखापत, गुडघेदुखी, थायरॉईड, मधुमेह, लठ्ठपणा, मानसिक असंतुलन, पिंपल्स, वेदना, सायटिका, डिटॉक्स या आजारांवर उपचार केले जात असल्याचे लिहिले होते. तसेच महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ॲक्युपंक्चरच्या सुया, मॅग्नेट, गोल मॅग्नेट पॅच, बॉडी डिटॉक्स मशीन, सर्कुलेशन मशीन, स्टीम रिलॅक्सिंग मशीन आणि इतर वस्तू होत्या.
 
नावापुढे लावायचे डॉक्टर
आरोग्य विभागाच्या चमुने तेथे उपस्थित महिला डॉक्टरंची चौकशी केली असता, त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय सुजोग असोसिएशनचा (ISA) सुजोग थेरपी इंडक्शन बेसिक लेव्हल कोर्स केल्याचे प्रमाणपत्र होते. याशिवाय त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र नसतानाही त्यांनी व्हिजिटिंग आणि हॉस्पिटलच्या फलकासमोर आणि नावासमोर डॉक्टर ही पदवी लिहिली होती. त्यामुळे 23 जुलै रोजी फिरोज खान असद खान यांनी खोलापुरीगेट पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसताना सर्वसामान्यांवर उपचार करून महाराष्ट्र भारतीय औषध परिषदेच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेविरुद्ध वैद्यकीय व्यवसायी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.