मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ७५ अर्जांना मंजुरी

    25-Jul-2024
Total Views |
- मनपास्तरीय समितीची बैठक संपन्न
- लवकरच फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा
- नोंदणीसाठी घेण्यात येणार शिबिरे

CM Vayoshree Scheme 
चंद्रपूर :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून योजनेअंतर्गत ७५ लाभार्थ्यांच्या अर्जांना मनपास्तरीय समितीच्या २४ जुलै रोजी मनपा सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 
समाज कल्याण कार्यालय येथे सदर अर्ज सादर केले जात असून योजनेअंतर्गत १०९ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ७५ पात्र अर्जांना मंजुरी देण्यात आली असून अपूर्ण कागदपत्रे असलेल्या अर्जदारांशी संपर्क साधुन कागदपत्रांची पुर्तता करण्यात येत आहेत. लवकरच फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा मनपातर्फे उपलब्ध करून दिली जाणार असुन वयोवृद्ध नागरिकांच्या सुविधेसाठी ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या ठिकाणी जाऊन विविध शिबिरे घेऊन नोंदणी केली जाणार आहे.
 
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे.
 
महानगरपालिका स्तरावर सदर योजनेची अंमलबजावणी, देखरेख करणे व लाभार्थ्यांची निवड करण्याच्या उद्देशाने शहरी भागाकरीता महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मनपा वैद्यकीय अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अशी मनपास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
 
पात्रतेचे निकष :
१. राज्यातील ज्येष्ठ नागरिक दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत वयाची ६५ वर्ष पूर्ण केली असावी.
२. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/ केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजने अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन पुरावा सादर करु शकतो.
३. उत्पन्न मर्यादा रु. २,००,०००/- आत
४. सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात शासनाद्वारे कोणतेही लाभ न घेतल्याचे घोषणा पत्र
५. लाभार्थ्यांच्या खात्यात ३,०००/- थेट लाभ झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत विहित केलेली उपकरण खरेदी करण्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील
६. निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येकी ३० टक्के महिला राहतील.
 
अर्ज कसा करावा
अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमूद अटीनुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे व लवकरच मनपा केंद्रातसुद्धा सादर करता येणार आहे.
 
योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
१. आधार कार्ड/मतदान कार्ड
२. राष्ट्रीय बँकेची पासबुक झेराक्स
३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
४. उपकरण/साहित्याचे (दुबार लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र )
५. उत्पनाचे स्वयंघोषणा पत्र
६. राशनकार्ड (पिवळी / केशरी)
७. जन्मतारखेचा पुरावा
८. ज्या साहित्याची आवश्यकता आहे त्यासाठी शासकीय किंवा मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून विहित नमुन्यात प्रमाणपत्र लाभार्थ्यांना घ्यावे लागणार आहे.
 
कोणते साहित्य खरेदी करता येणार?
१. चष्मा
२. श्रवणयंत्र
३. ट्रायपॉड
४. स्टिक
५. व्हील चेअर
६. फोल्डिंग वॉकर
७. कमोड खुर्ची
८. नि-ब्रेस
९. लंबर बेल्ट
१०. सर्व्हायकल कॉलर इत्यादी