व्यसन भागविण्यासाठी चोरला ऑटोरिक्शा

    24-Jul-2024
Total Views |
- कळमना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Stolen autorickshaw(Image Source : Internet/ Representative) 
 नागपूर :
व्यसन आणि मौजमस्ती करण्यासाठी एका तरुणाने नवीन ऑटोरिक्शा चोरी केला. ग्राहकाच्या शोधात असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी तो कळमना मार्केटमध्ये चोरीसाठी जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. भूषण उर्फ किशोर सुपारे (20) रा. पारडी असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो पोलिस अभिलेखावर आहे.
 
भूषण हा बारावी पास आहे. त्याचे वडीलही ऑटोरिक्शा चालवतात. भूषण विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेला आहे. आपले शौक पूर्ण करण्यासाठी भाड्याने ऑटोरिक्शा चालवतो. मात्र, मिळकत तुटपुंजी आणि शौक भरमसाठ असल्याने त्याला नेहमीच पैशांची गरज भासते. त्यामुळे त्याने चोरीचा मार्ग निवडला. फिर्यादी विजय सेलोटकर (40) रा. गौरीनगर हे सुद्धा ऑटोरिक्शा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तीन महिन्यांपूर्वीच बँकेतून कर्ज काढून त्यांनी साडेतीन लाख रुपये किंमतीचा नवीन ऑटोरिक्शा घेतला होता. भूषणला याची माहिती होती. गत 2 जूनच्या रात्री 11.30 वाजताच्या सुमारास विजय यांनी त्यांचा एमएच-49/सीएफ-1726 क्रमांकाचा ऑटोरिक्शा नेहमीप्रमाणे घरासमोर ठेवला होता. मध्यरात्रीनंतर अज्ञात आरोपीने त्यांचा ऑटोरिक्शा चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आसपास ऑटोचा शोध घेतल्यानंतर त्यांनी कळमना पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
 
पाठलाग करून पकडले
सोमवारी कळमना पोलिस हे ठाण्यांतर्गत गस्त घालत होते. दरम्यान एक विना नंबरचा ऑटोरिक्शा जाताना दिसला. पोलिसांनी चालक भूषणला थांबण्याचा इशारा केला असता त्याने गती वाढवून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून ऑटोरिक्शा थांबवला. भूषणला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने ऑटो चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक करून ऑटो जप्त केला. पुढील चौकशी सुरू आहे.