महाविकास आघाडीच्या वतीने 26 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

    24-Jul-2024
Total Views |
- आक्रोश मोर्चामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हा: माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

Mahavikas Aghadi 
खामगाव :
अस्मानी व सुल्तानी संकटामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी हा अडचणीमध्ये सापडलेला आहे. मागील वर्षीचे पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही. अतिवृष्टीमुळे संपुर्ण शेतीपिके खरडुन गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु, शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. विदर्भात मागील 6 महिन्यात 618 शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली आहे. अश्या संकटसमयी बळीराजाला शासनाकडून संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पिक विम्याचे पैसे तात्काळ मिळावे, अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, खामगाव जिल्हयासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती व्हावी, खतांचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, विविध योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी, वीज बिलाची दरवाढ रदद्‌‍ करावी यासह शेतकरी बांधवांच्या इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवार 26 जुलै 2024 रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
या आक्रोश मोर्चाला सकाळी 10 वाजता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्ड पासुन सुरुवात होणार असून हा आक्रोश मोर्चा टिळक पुतळा मार्गे, भारत कटपीस स्टोअर्स समोरुन महावीर चौक, मोहन चौक, फरशी चौक मार्गे, सहेली कॉम्पलेक्स समोरुन, भगतसिंग चौक, चंदनशेष चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तरी शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये खामगाव विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच शेतकरी बांधवांनी स्वयंस्फुर्तीने मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.