दगडाने ठेचले पत्नीचे डोके

    24-Jul-2024
Total Views |
- चारित्र्यावरील संशयातून घडली घटना, आरोपी पती फरार

Crime 
नागपूर :
चारित्र्यावरील संशयातून एका व्यक्तीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. दगडाने डोके ठेचून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि फरार झाला. ही थरारक घटना पावनगाव परिसरात घडली. आरती रमेश तिवारी (40) रा. देवीनगर, पारडी, असे जखमी महिलेचे नाव आहे. फरार पती रमेश जगजीवनप्रसाद तिवारी (45) याचा शोध सुरू आहे.
 
आरोपी रमेश हा पूजा-पाठ करून घर चालवतो. कुटुंबात पत्नी आरती आणि 3 मुले आहेत. रमेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून नेहमीच पती-पत्नीत वाद होत होते. रमेशने मारहाण केल्यामुळे आरती काही दिवसांपूर्वी घरसोडून आपल्या गावी रीवा येथे गेली होती. नंतर दोघांत समजवता झाला आणि आरती परतली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी रमेश घरी परतला तेव्हा आरती कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. त्याने विचारले असता तिने उत्तर दिले नाही. त्याच्या मनात संशयाने घर केले आणि रमेशने तिला मारहाण केली.
 
मंगळवारी आरतीने घरसोडण्याची तयारी केली. तिला कोणत्यातरी आश्रममध्ये जायचे होते, मात्र रमेशने तिची समजूत काढली. जावयाच्या घरी सोबत येण्यास म्हटले. त्यानंतर भूखंड पहायला जाण्याच्या बहाण्याने पावनगाव परिसरात घेऊन गेला. निर्जनस्थळी घेऊन जात तिच्याशी वाद घातला. या दरम्यानच मोठा दगड उचलून आरतीच्या डोक्यात घातला. रक्ताची धार लागली. आरती मदतीसाठी आरडा-ओरड करू लागली. गावचे लोक जमताना पाहून रमेश फरार झाला.
 
आरतीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले. आरतीला उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून रमेशचा शोध सुरू केला आहे