वायसीसीई आणि एनपीटीसी ग्रुप ऑफ कॉलेजेस मध्‍ये करार

    24-Jul-2024
Total Views |
- संयुक्‍त अभियांत्रिकी शिक्षण उपक्रम राबवणार

Agreement between YCCE and NPTC Group of Colleges 
 
नागपूर :
एनपीटीसी ग्रुप ऑफ कॉलेजेस (वेल्स, यूके) आणि यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई) यांच्‍यामध्‍ये संयुक्‍त अभियांत्रिकी शिक्षण उपक्रम राबविण्‍यासाठी करार झाला आहे.
 
वायसीसीईच्‍या मेकॅनिकल विभागाचे माजी विद्यार्थी व एनपीटीसी ग्रुप ऑफ कॉलेजेसचे इंडिया असोसिएट गगन अग्रवाल, जॉर्डन ब्रिस्कहॅम, ज्युलियन होइले, एनपीटीसी ग्रुप ऑफ कॉलेजेसचे वर्ल्डवाइड ऑपरेशन्सचे संचालक जेम्स लेलेवेलिन यांनी नुकतीच महाविद्यालयाला भेट दिली. भेटीदरम्यान, महाविद्यालयाच्‍या मेकॅनिकल विभागातील अत्‍याधुनिक सुविधा आणि शिकवण्याच्या पद्धतीमुळे ते प्रभावित झाले.
 
एनटीपीसी ग्रुप ऑफ कॉलेजेस हा युनायटेड क‍िंगडम येथील वेल्सचा सर्वात मोठा शैक्षणिक समूह असून येथे जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाते. गगन अग्रवाल म्हणाले की, वायसीसीईचा मेकॅनिकल इंजिनियरींग विभाग यंत्रसामग्रीचा विकास, डिझाइन, उत्पादन आणि देखभाल करण्‍यात अग्रेसर आहे. सध्याच्या युगातील मेकॅनिकल इंजिनीयरींग तज्‍ज्ञांची मागणी लक्षात घेता नवीन तांत्रिक क्षेत्रांमध्ये जुळवून घेण्याची आणि सर्जनशील बनण्याची क्षमता या विभागात आहे. या विभागाकडे ऑटोमेशन क्षेत्रातीत सीमेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स असून उद्योग आणि संशोधन आणि विकास संस्थांशी चांगले संबंध ठेवले आहेत. येथे रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधील यांत्रिक अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट प्रोग्राम सुरू करण्‍यात येतील.
 
येत्‍या नोव्हेंबरमध्ये एनपीटीसीच्‍या आठ विद्यार्थ्यांना नागपूरला संयुक्त प्रकल्पांसाठी या वेळी भेट दिलेल्या प्राध्यापकांसह पाठविण्‍यात येणार असून ते मशीनिंग प्रकल्पाची सुरुवात करतील, असेही ते म्‍हणाले.
 
वासीसीईचे प्राचार्य डॉ. यू. पी. वाघे, यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. जयंत गिरी यांच्‍या पुढाकाराने हा करार झाला असून मध्य भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील हा पहिलाच करार आहे.
 
यावेळी डॉ. जयंत गिरी यांच्‍यासह मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. एस. चौधरी, मेकॅनिकल इंजिनियरींग विभागाचे सहायक प्रमुख डॉ. आर. बी. चाडगे, प्रा. अजिंक्य एदलाबादकर यांच्यासह मेकॅनिकल विभागाचे सर्व प्राध्यापक उपस्‍थ‍ित होते.