सरकार टिकवण्यासाठी बिहार आंध्रला भरघोस निधी तर महाराष्ट्राची उपेक्षा; नाना पटोलेंचे टीकास्त्र

    23-Jul-2024
Total Views |
Nana Patoles Criticism
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कारण अर्थसंकल्पातून बिहार आणि आंध्रप्रदेशला भरघोस निधी देण्यात आला आहे. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत यावरून शिंदे-फडणवीस-अजित पवारांची केंद्रात काही पत नाही हे स्पष्ट झाले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
 
अर्थसंकल्पात एनडीए सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त कर देते पण परतावा देताना भाजपा सरकार सुडबुद्दीने वागते याचा प्रत्येय अर्थसंकल्पातून दिसून आला. बिहार व आंध्र प्रदेशाला ४० हजार कोटींचा निधी देताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला नाही. महाराष्ट्राबद्दल भाजपा व गुजरात लॉबीला आकस आहे हे पुन्हा दिसून आले आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्थमंत्री व पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळत आहेत त्यावरून त्यांना महाराष्ट्रापेक्षा आपल्या खुर्चीची चिंता असून ते सत्तेसाठी लाचार आहेत हे दिसून येते, असा घणाघातही पटोले यांनी केला.