भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प

    23-Jul-2024
Total Views |
- प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
 
Bawankule gave reaction on Union Budget
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
भारताला आर्थिकदृष्टया बळकट व जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा, अतिशय सकारात्मक असा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे.
 
 
एक्स समाजमाध्यमावर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, नैसर्गिक शेतीसह शेतीच्या उत्पादकतेत वाढ करण्याचे ध्येय, गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून एक कोटी घरे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी माफक व्याजावर दहा लाखांचे कर्ज, युवकांना पहिल्या नोकरीत अर्थसाह्य, ३. ५७ लाखांपर्यंत आयकरातून सूट देत सॅंडर्ड डिडक्शनात सुसूत्रता आणून नोकरदारांना मोठा दिलासा, सर्व राज्य सरकारांना १५ वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देऊन विकासात्मक योजना चालविण्यास प्रोत्साहन, पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी देशभरात आर्थिक गुंतवणूक, हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास, कँसरचा महागडा उपचार माफक करण्यासाठी औषधं स्वस्त, शिक्षण, कौशल्य विकास व रोजगार वाढीचे लक्ष्य पक्के करण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहने, लिथीयम बॅटरी, सौर ऊर्जा पॅनल ला घसघशीत सवलत देऊन पर्यावरणपूरक अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणारा अतिशय संतुलित असा आजचा अर्थसंकल्प आहे, असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास त्यातून प्रतीत होतो. भारताने 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान...' हा नारा आजवर प्रबळ केला; यापुढे 'जय अनुसंधान..!!' हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास मिळतो. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या गरजा, आकांक्षा आणि कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे... आणि तेच आज अधोरेखित झाले, असेही ते म्हणाले.