अखेर बामणी प्रोटीन्स कायमची बंद होणार

    23-Jul-2024
Total Views |
 
Bamni Proteins
 
बल्लारपूर :
गत काही दिवसांपासून बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील बामणी प्रोटीन लिमिटेड हा उद्योग प्रदूषणाच्या तक्रारीवरून बंद करण्यात आला होता. आणि सुधारणा करून पूर्ववत सुरू करण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु व्यवस्थापनाने उद्योग सुरू करण्याऐवजी शासनालाच दोष देणे सुरू केलेले होते. तसेच आता आमच्याकडे हा उद्योग चालवण्याकरिता प्रदूषणाकरिता कोणतेही तंत्रज्ञान नाही उलट शासनानेच आम्हाला यावर उपाय सांगावा तरच आम्ही उद्योग सुरू करू अशी भूमिका घेतलेली होती.
 
त्यावर उद्योगातील कामगार युनियन यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शासना सोबत पाठपुरावा करून ९ जुलै २०२४ ला अधिवेशन काळात मुंबई येथे संयुक्त बैठकीही लावलेली होती, त्या बैठकीत बामणी प्रोटीन उद्योगाला त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व परवानगी देण्याचे मा.मुख्यमंत्र्यांतर्फे मान्य सुद्धा करण्यात आले होते सोबत तसे पत्रही व्यवस्थापनाला देण्यात आलेले होते, बामणी प्रोटीन्स उद्योग आता लवकरच सुरू होईल अशा चर्चाही सर्वत्र रंगायला लागलेल्या होत्या, आणि सोशल मीडिया आणि पेपर मीडियावर सुद्धा त्याच्या बातम्या झळकलेल्या होत्या परंतु हे सर्व झाल्यानंतरही उद्योग सुरू करण्याऐवजी व्यवस्थापनाने महाराष्ट्र सरकार आणि कायद्याला न जुमानता कामगारांच्या बँक खात्यात अंतिम हिशोबाची रक्कम १९ जुलै २०२४ ला टाकून आता व्यवस्थापनाचा आणि कामगारांचा संबंध संपुष्टात आला असे पत्रही पोस्टाने पाठवण्याचे धाडस केले.
 
कामगार कायद्यानुसार व्यवस्थापनाने उद्योगात केलेले टाळे बंद हे बेकायदेशीर असल्याचे पत्र सुद्धा कामगार विभागातर्फे आपणाला देण्यात आलेले होते परंतु कामगार विभागाला सुद्धा बामणी प्रोटीन व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली. एकंदरीत या दुर्भाग्यपूर्ण निर्णयामुळे आता कामगारांचे आयुष्य अंधारात आलेले असून शासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.